– भाई रामदास जराते यांच्या प्रयत्नांना यश
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते, महिला नेत्या जयश्रीताई जराते यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाच्या घरकूल योजनेपासून वंचित असलेल्या ढिवर समाजातील ३५ कुटुंबांना वेअर हाऊस काॅर्पोरेशन नवी दिल्ली यांच्या वतीने ढिवर मोहल्ला सुधार प्रकल्पाअंतर्गत घरकूल बांधून देण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील ढिवर समाजाची असलेली बिकट परिस्थिती आणि शैक्षणिक मागासलेपणामुळे कागदपत्रांच्या अभावी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणींमुळे हा समाज विकासापासून वंचित आहे. सदर बाब लक्षात घेवून शेतकरी कामगार पक्षाचे आदिवासी, भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते, महिला नेत्या जयश्रीताई जराते यांनी मुंबई येथील सेंटर ऑफ ट्रान्सफार्मींग इंडिया या संस्थेला ढिवर समाजाच्या सदर परिस्थितीचा अभ्यास करण्याची विनंती केली होती. संस्थेच्या संचालिका आणि शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी त्यांचे पथक पाठवून गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांना भेटी देवून सर्वेक्षण केले असता ढिवर समाजाच्या दारिद्र्याचे भीषण वास्तव समोर आले. यात आरोग्य, शिक्षण, रोजगार यासोबतच निवासाची बिकट अवस्था लक्षात घेता संस्थेच्या वतीने ढिवर मोहल्ला सुधार प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
या प्रकल्पाला सेंट्रल वेअरहाऊस काॅर्पोरेशन नवी दिल्ली यांच्याकडून मंजुरी मिळाल्याने आता त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात गडचिरोली तालुक्यातील गुरवळा, मुडझा, काटली व चामोर्शी तालुक्यातील मोहुर्ली, सगणापूर, हळदी या गावातील गरजू ढिवर कुटुंबांना ३५ घरकुलांचे बांधकाम करुन देण्यात येणार आहेत. तसेच ढिवर मोहल्ला सुधार प्रकल्पाअंतर्गत लवकरच शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या योजनाही संस्थेच्या वतीने सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सातत्याने पाठपुरावा करुन ढिवर मोहल्ला सुधार प्रकल्प आणि त्याअंतर्गत घरकुलांचा गरजूंना लाभ मिळवून दिल्याबद्दल सीएफटीआयच्या संचालिका चित्रलेखा पाटील, अमित देशपांडे, प्रसाद मुनगेकर, शेकाप नेते भाई रामदास जराते आणि महिला नेत्या जयश्रीताई जराते यांचे भटके – विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डंबाजी भोयर, विनोद मेश्राम, मारोती आगरे, चंद्रकांत भोयर, रामदास दाणे, किसन साखरे, महेंद्र जराते, देवेंद्र भोयर, योगेश चापले, अशोक ठाकूर आणि घरकूल लाभार्थी व शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त केले आहे.







