आमदार कृष्णा गजबेंच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांसह विज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक

185

– मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार – सारवे

गडचिरोली : महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांंची वारंवार करण्यात येत असलेल्या पिळवणुकीच्या निषेधार्थ आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात ३ डिसेंबर रोजी देसाईगंज येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाला शेकडो कार्यकर्त्यांसह धडक देण्यात आली व रास्त न्याय मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणींसह संपूर्ण मागण्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन अधीक्षक अभियंता घनश्याम सारवे यांनी सदर मोर्चाला सामोरे जाताना दिली असल्याने तुर्तास न्याय मागण्यांना घेऊन करण्यात येणारे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

अवकाळी पावसामुळे आधीच अडचणींचा सामना करावा लागत असलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कृषीपंपांचे कनेक्शन कापल्या जात असल्याने शेतकऱ्यांना अधिकच अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात धान पिक लागवड केली होती. परंतु माहे सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात धान पिकावर झालेल्या मावा तुडतुडा व गाद रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे अतोनात नुकसान होऊन उत्पन्नात प्रचंड घट आली आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शेतकऱ्यांना धान पिकासह फळपिकाची लागवड करणे अत्यावश्यक झाले असून यासाठी विजेची अत्यंत आवश्यकता आहे.
तथापी राज्य शासनाकडून आश्वासनांच्या खैरातीने शेतकऱ्यांनाची वारंवार पिळवणूक केल्या जात असल्याचे स्पष्ट होऊ लागल्याने या विरोधात येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यासह मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आमदार गजबे यांनी दिला होता.
दरम्यान, सादर करण्यात आलेल्या निवेदनानुसार कृषी पंपावरील बंद करण्यात आलेले ट्रान्सफार्मर त्वरीत सुरु करण्यात यावेत, कृषी पंपाची सक्तीची वसुली त्वरीत थांबविण्यात यावी, कृषी पंपाचे जळालेले रोहिञ वसुली न करता तत्काळ बदलुन द्यावे, कृषी पंपाच्या बिल वसुलीसाठी रोहिञे बंद करणे त्वरीत थांबवावे, कृषी पंपाचे विज कनेक्शन तोडण्याआधी संबंधित शेतकऱ्यांना पूर्वसूचना देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. या मागण्या आपल्या स्तरावरुन पुर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी देसाईगंजचे अधीक्षक अभियंता घनश्याम सारवे यांनी सदरच्या मोर्चाला दिले असुन शेतकऱ्यांनी देखील कंपनीला आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तथापी समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आल्याने तुर्तास आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, नगराध्यक्षा शालुताई दंडवते, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, महिला व बाल कल्याण सभापती रोशनी पारधी, सभापती रेवता अलोने, उपसभापती अर्चना ढोरे, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ठेंगरी, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सुनील पारधी, तालुका अध्यक्ष राजु जेठानी, नगरसेवक नरेश विठ्ठलानी, दिपक झरकर, नखाते काकाजी, सचिन खरकाटे, माजी सभापती मोहन गायकवाड, योगेश नाकतोडे, वसंत दोनाडकर, मदन बंपुरकर, गोपाल उईके, अशोक नंदेश्वर, श्यामराव अलोने, श्याम उईके, बारसागडे मॅडम, धनंजय तिरपुडे, अनिल मस्के, केवळराम नाकाडे, गौरव नागपूरकर, शामराव अलोने, केवळराम झोडे, चंद्रकांत नाकाडे आदी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.