शेतकरी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : आ. डॉ. देवराव होळी

116

गडचिरोली : अवकाळी पावसामुळे अगोदरच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता राज्य सरकारने कृषीपंपाचे विज कनेक्शन कापलेे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आमदार डॉ. देवराव होळी यांना याबाबतचे निवेदन दिले. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची वारंवार होणारी पिळवणूक बघता सरकारच्या या कृतीच्या निषेधार्थ व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात चामोर्शी येथील तहसील कार्यालयावर २९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता जनसंपर्क कार्यालय ते तहसिल कार्यालय असा शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले आहे. राज्यात ठाकरे सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू केली असून शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा विद्युतपुरवठा कोणतीही पूर्व सूचना न देता खंडित करण्यात येत आहे. दरवर्षी धानाला देण्यात येणारा बोनस यावर्षी नाकारण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांच्या कळपा पाण्यात सापडल्याने शेतकर्‍यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे . माञ अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची घोषणा अथवा भरपाई नाही. २०१९-२० अंतर्गत करण्यात आलेल्या धडक सिंचन विहिरींची थकीत बिल अजुनपर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आली नाही. घरकुल लाभार्थ्यांच्या प्रपत्र ‘ड’ च्या यादीचे चुकीचे निरीक्षण करून अनेक गरजुंना घरकुलाच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजने अंतर्गत कर्जमाफी घोषित करण्यात आली. परंतु त्या घोषित कर्जमाफीनुसार जिल्हयातील हजारो शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य लोकांच्या जीवावर उठले असून या सरकारला जागे करण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी दिली आहे. या शेतकरी मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.