राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या भ्रष्टाचारामुळे कुुनघाडा रै. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर : माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी यांचा आरोप

34

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : नागरिकांच्या तक्रारीनुसार माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी व काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने कुनघाडा रै. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता विदारक चित्र समोर आले. कुनघाडा रै. प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत जिर्ण झाल्यामुळे तिचे निर्लेकन करुन राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत करोडो रुपयाचा निधी मंजुर करुन नवीन बांधकाम करण्यात आले. यासाठी केंद्रीयकृत निविदा काढून बांधकामाचे कंत्राट देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात ज्या कंत्राटदाराला कंत्राट दिले होते, त्यांनी बांधकाम न करता जिल्हयातील एका पेटी कंत्राटदाराला काम देवून इमारतीच्या बांधकामाला सुरुवात केली. संबंधित कंत्राटदाराने अतिशय निकृष्ठ बांधकाम केल्यामुळे व राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेच्या इंजिनिअरने योग्यप्रकारे लक्ष न दिल्यामुळे उद्घाटनापुर्वीच प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत गळायला लागली आहे. निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरल्याने इमारत दुरावस्थेमध्ये आहे. त्यामुळे मागील तीन ते चार वर्षांंपासून ग्रामपंचायतच्या छोटयाशा इमारतीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सुरु असून फार मोठ्या गंभीर अवस्थेत रुग्णांना उपचार दिला जात आहे. रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्यामुळे कुनघाडा रै. परिसरातील जनता आरोग्य सेवेपासून वंचित आहे. नवीन पी.एच.सी. चे डिजाईन अयोग्य आहे. तेथील शस्त्रक्रियागृह तळमजल्यावर असून वार्ड पहिल्या मजल्यावर आहे. तळ मजल्यावरुन वरच्या मजल्यावरील वार्डामध्ये शस्त्रक्रिया केलेल्या पेशंटला नेण्यासाठी रॅम्प बांधण्याऐवजी पाय-यांचे बांधकाम केले असल्याने आपरेशन केलेले बेशुध्द रुग्ण वरच्या मजल्यावर न्यायचे कसे? असा प्रश्न आरोग्य कर्मचाराऱ्यासमोर उपस्थित होत आहे. चुकीच्या नियोजनामुळे बांधकाम चुकीचे झाले असून, करोडो रुपये खर्च करून बांधकाम केलेली नवीन इमारत कुचकामी ठरत आहे.
काँँग्रेस शिष्टमंडळाने खोलवर चौकशी केली असता, सर्पदंश, आरगाॅनो फास्फरस पायजेनीग सारख्या पावसाळयात उद्भवणा-या अतिशय घातक अशा आजारांचा प्राथमिक उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या औषधीसाठा सुध्दा उपलब्ध नव्हता. अशा गंभीर आजाराच्या पेशंन्टला पुरेसा प्राथमिक उपचार न करता रेफर करीत असल्याने वाटेतच रुग्णाचे मृत्यु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणाची सखोल चैकशी करुन दोषीवर कारवाई करण्यात यावी अन्यथा काँँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार तथा काँँग्रेसचे प्रदेश महासचिव डॉ. नामदेव उसेंडी यांनी दिला आहे
यावेळी काँँग्रेसचे कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, उपाध्यक्ष अनिल कोठारे, अतुल भांडेकर, लालाजी सातपुते, संतोष गव्हारे, रमेश कोठारे, पितांबर टिकले, भिमाशंकर चापडे, रमेश सातपुते व गावकरी उपस्थित होते.