चातगाव परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

116

– आरोग्य धोक्यात, कारवाई करण्याची जनतेची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र नसतानाही बोगस डॉक्टर बेधडकपणे रुग्णांवर उपचार करून त्यांच्या आरोग्याशी खेळत आहेत. ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांच्या संख्येत वाढ झाली असून धानोरा तालुक्यातील चातगाव येथेही बोगस डॉक्टराचा बोलबाला असल्याचा प्रकार पुढे आला आहे. येथे रुग्णांवर बेकायदेशीर उपचार केल्या जात असल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे प्रशासन व आरोग्य विभागाने गांभिर्याने लक्ष देऊन बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे. गडचिरोली – धानोरा मार्गावर चातगाव हे गाव वसलेले असून परिसरात प्रसिद्ध व मध्यवर्ती गाव आहे. या गावात एका बोगस डॉक्टराने परवानगी न घेता बेकायदेशीरपणे स्वत:चे खासगी रुग्णालय सुरू करून रुग्णांवर उपचार केल्या जात आहे. त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकाराबाबत गावातील काही समाजसेवकांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती. परंतु अजूनपर्यंत त्याच्यावर कारवाई न झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. याकडे आतातरी प्रशासनाने लक्ष देऊन बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी जनतेकडून होत आहे.