द्वेषभावनेतूनच आपल्याला बदनाम करण्याचा काही नगरसेवकांचा डाव : नगराध्यक्ष योगिता पिपरे

88

– न्यायालयाच्या निर्णयानंतर पिपरे झाल्या पुन्हा पदारूढ

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शासनाच्या नियमानुसारच वाहन भाड्याची उचल केली असताना सुद्धा भाजपातीलच काही नगरसेवकांनी द्वेषभावनेतूनच आपल्याला बदनाम करण्याचा डाव रचला व आपल्याविरोधात तक्रार केली. केवळ राजकीय आकसापोटी आपल्यावर सूडबुद्धीने अपात्रतेची कार्यवाही करण्यात आली. मात्र उच्च न्यायालयाने अपात्रतेची कार्यवाही रद्द करून आपल्याला न्याय मिळवून दिला असल्याचे नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी नगर परिषदेच्या दालनात 9 डिसेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

पत्रकार परिषदेपूर्वी योगिता पिपरे यांनी बॅंडबाजाच्या गजरात नगर परिषदेत प्रवेश करुन नगराध्यक्ष पदावर पुन्हा पदारूढ झाल्या. पत्रपरिषदेत माहिती देताना नगराध्यक्ष योगिता पिपरे पुढे म्हणाल्या, गडचिरोली शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. त्यामुळे विरोधकांनी मला बदनाम करण्याचा डाव रचला. मात्र न्यायालयाच्या निकालाने विरोधकांचे मनसुबे हाणून पडले असल्याचे त्या म्हणाल्या. विरोधकांच्या तक्रारीमुळे व न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे शहराचा विकास खुंटला आहे. आपल्याला शहराच्या विकासाची तळमळ असून अपूर्ण राहिलेले कामे तातडीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी दिली. या पत्रकार परिषदेला नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, नितीन उंदीरवाडे, केशव निंबोड, नगरसेविका अल्का पोहनकर, वैष्णवी नैताम, वर्षा नैताम, लता लाटकर, नितांत उंदीरवाडे, भाजपा कार्यकर्ते अनिल पोहनकर, जनार्दन साखरे, देवाजी लाटकर, प्रतिभा चौधरी, वर्षा शेडमाके, पूनम हेमके, विनोद देवोजवार, श्याम वाढई, युवराज बोरकुटे, सोमेश्वर धकाते, नरेश हजारे, सागर कुमरे, हर्षल गेडाम, बालाजी भांडेकर आदी उपस्थित होते.