– उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भाजपा खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांचे साकडे
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम, आदिवासी व नक्षलग्रस्त असून जिल्ह्यात मोठे उद्योग नसल्याने जिल्हावासी शेतीवर अवलंबून आहेत. जिल्ह्यात सिंचनासाठी नदी, नाले, विहीर व शेतातील बोअरवेल चे पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी खरिप व रब्बी/उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात धान या मुख्य पिक व भाजीपाला पिकांची लागवड करतात. सदर पिकांना पाणी आवश्यक असते. परंतु मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कृषि पंपाना पुरवठा करण्यात येत असलेला 12 तास विज पुरवठा राज्यातील विज तुटवड्यामुळे स्थगित करुन कृषि पंपाना केवळ 8 तास विज पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील धान व भाजीपाला उत्पादक शेतकरी पाणी उपलब्ध असुनही पुरेशा विज पुरवठ्या अभावी मोठ्या अडचणीत आलेले आहेत.
शेतकऱ्यांनी नुकतीच धान पिकाची रोवणी केली असुन सद्यस्थितीत पिक जगविण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्याकरिता शेतकऱ्यांकडून कृषिपंपाना पुर्ववत दिवसा 12 तास विज पुरवठा करण्याची मागणी होत आहे. सदर मागणीच्या अनुषंगाने आमदार कृष्णा गजबे यांचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून देसाईगंज येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन व एकुणच परिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेऊन खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे व आमदार डॉ देवराव होळी यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यातील भाजपच्या शिष्टडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री व गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेतली.
यावेळी नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी विज कंपनीच्या अधिकाऱ्यांना निर्देश देऊन ही समस्या लवकरच सोडविण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात खासदार, आमदार महोदयांसोबत लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, भाजपा वडसा तालुका अध्यक्ष सुनील पारधी, महामंत्री वसंता दोनाडकर, कैलास पारधी, मोहन गायकवाड, बंगाली आघाडी नेते सुरेश शहा हे प्रामुख्याने उपस्थित होते.







