– विरोधी पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे प्रमुख तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्यासह अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, मुलचेरा, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या पाच तालुक्यातील आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे पाच तालुक्याचे आविसं अध्यक्ष, सरपंच, नगर पंचायत अध्यक्ष आणि माजी सरपंच, उपसरपंच, सदस्यसह अहेरी विधानसभा क्षेत्रातील हजारो आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने 24 डिसेंबर रोजी आलापल्ली येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केले असून अजयभाऊ कंकडालवार यांच्यासह आविसं व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजपाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
काँग्रेसचे नेते महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेता तथा ब्रम्हपुरी विधानसभाचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत सर्वांनी आलापल्ली येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आदिवासी विद्यार्थी संघटनेचे अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्व नेते-कार्यकर्त्यांचे पक्षांतर झाल्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाली आहे. आता या प्रकारावरून आविसं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव वाढल्याची चिन्ह आहेत.
माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचे खंदेसमर्थक व कट्टर म्हणून ओळख असलेले गडचिरोली जिल्हा परिषदचे माजी जि. प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार, त्यांची पत्नी माजी पंचायत समिती उपसभापती सोनालीताई अजय कंकडालवार, सिरोंचा आविसं तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, इंदाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच वैभव कंकडालवार, अहेरी विधानसभा क्षेत्रातील आविसंचे कट्टर समर्थक आणि त्यांचे कुटुंबीय आदिवासी विद्यार्थी संघटनेमधून राजकारण करत होते. अखेर आविसंसह विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते, सरपंच व उपसरपंचसह आविसंला सोडचिठ्ठी दिली. महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत त्यांचा काँग्रेस पक्ष प्रवेश पार पडला.
आपल्या काँग्रेस पक्षातील प्रवेशाबाबत माहिती देताना अजयभाऊ कंकडालवार म्हणाले, अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्यासह ग्रामीण भागाच्या विकासासाठी आम्ही काम करत असून अजूनही काम करायचे आहे. महाविकास सरकार असताना त्यासाठी निधी व योजनांना मंजूरी दिली आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेते विजयभाऊ वड्डेटीवार यांनी आपल्याला मदत केल्याची आठवण अजयभाऊ कंकडालवार यांनी केली.
पुढे ते म्हणाले, मी आणि माझा सर्व परिवार हा पिढीजात आविसंचे आहेत आणि होतो. पूर्वी आविसंचे पुढारी हे छोट्या मोठ्या सर्व कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहत असत आणि अडीअडचणी सोडवण्यासाठी देखील काम करीत असत. पण मध्यंतरी काळातील पुढारी मात्र पक्ष वाढीसाठी नव्हे तर पक्ष संपवण्यासाठी काम करताय. आम्ही अहेरी विधानसभा क्षेत्राचा विकासासाठी अनेकदा आविसंच्या माजी आमदारांना अनेकदा जाऊन भेटलो. पण काही उपयोग झाला नसून अहेरी विधानसभा क्षेत्राकडे त्यांचे लक्ष नसल्याचे चित्र दिसून आल्याचे, अजयभाऊ कंकडालावर यांनी सांगितले.
यावेळी बोलताना आदिवासी विद्यार्थी संघटनेचे एटापल्ली तालुका अध्यक्ष मट्टा मी म्हणाले, आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढत होतो आणि आजही लढू. अजयभाऊ यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून उत्तम निर्णय घेतला असून विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या माध्यमाने आपल्या समस्या सोडवू आणि आपण जोमाने काम करणार असल्याचे ते म्हणाले.







