गडचिरोली जिल्हा क्रीडा स्टेडियमच्या बांधकामाची चौकशी होणार

56

– ४ सदस्यीय समितीमार्फत चौकशी ; क्रीडामंत्री संजयजी बनसोडे यांचे आदेश

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या मागणीवरून विधानभवनात बैठक

– कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने १ कोटी रुपयांच्या बांधकामाच्या खोट्या एमबी तयार करून बिलाची उचल केल्याचा आ. होळी यांचा आरोप

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा स्टेडियमचे बांधकाम  निकृष्ट दर्जाचे असून बांधकाम अतिशय संथगतीने होत आहे.  त्यातच कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी संगनमताने १ कोटी रुपयांच्या बांधकामाच्या खोट्या एमबी तयार करून बिलाची उचल केली असल्याचा गंभीर आरोप आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी क्रीडा मंत्र्यांच्या उपस्थितीत विधानभवनात झालेल्या बैठकीत केले असता या सर्व प्रकरणाची चौकशी ४ सदस्य समितीच्या मार्फत करून ८ दिवसात त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश राज्याचे क्रीडामंत्री ना. संजयजी बनसोडे यांनी विधानभवनातील झालेल्या बैठकीमध्ये सचिवांना दिले.

आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या मागणीवरून गडचिरोली जिल्हा क्रीडा स्टेडियमच्या निकृष्ट बांधकाम व कंत्राटदाराची निविदा  रद्द करण्यासंदर्भात मंत्री महोदयांनी विधान भवनातील उपसभापती यांच्या दालनामध्ये सदर बैठकीचे आयोजन केले. १ जून २०२३ पासून दररोज ५ हजार रुपये दंड रक्कम ठोठावूनही  कंत्राटदार शासनाच्या कोणत्याही पत्राचे पालन करण्यास प्रतिसाद देत नाही. कंत्राटदाराला फक्त कामे करण्यात व निकृष्ट दर्जाची कामे करण्यात रस असून जिल्हा क्रीडा संकुल यवतमाळ येथेही त्यांनी अशाच प्रकारचे निकृष्ट दर्जाचे काम केल्याने या कंत्राटदादाला काळया यादीसाठी नोटीस बजावलेली आहे. त्यातच या कामात कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने १ कोटी रुपयांच्या बांधकामाच्या खोट्या एमबी तयार करून बिलाची उचल केली असल्याची बाब निदर्शनास आली असल्याची माहिती आमदार महोदयांनी बैठकीत दिली. यावर सदर प्रकरणाची चौकशी समितीमार्फत करण्यात यावी, असे निर्देश मंत्री महोदयांनी दिले.

मंत्री महोदय यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्यासह क्रीडा विभागाचे सचिव, आयुक्त क्रिडा व युवक सेवा पुणे, संचालक क्रीडा व युवक कल्याण, कार्यकारी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग गडचिरोली, वास्तु विशारद क्रीडा संकुल बांधकाम समिती गडचिरोली, जिल्हा क्रीडा संकुलाचे कंत्राटदार आणि वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.