– आदिवासी कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके यांची उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात झेंडेपारच्या लोहखाणीची लिज पाच कंपन्यांना देण्यात आली. मात्र या ठिकाणी उद्योग उभारल्याशिवाय झेंडेपारच्या खाणींना परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी आदिवासी कॉंग्रेस कमिटीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत आज, २४ नोव्हेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता शेडमाके यांनी या संदर्भात त्यांना निवेदन सदर केले. उद्योगविरहीत गडचिरोली जिल्ह्यातील मौल्यवान खनिज संपत्तीची अशी लुटमार करण्यासाठी उद्योगपतींना दावनीला बांधले याचे दु:ख आहे. सरकार यंत्रणेचा वापर करीत या खाणींना परवानगी दिली असली तरी या मागास जिल्ह्याच्या प्रगतीसाठी त्यातून कोणताही हातभार लागणार नाही. येथील बेरोजगारांच्या हाताला थातुरमातून कामाशिवाय काही मिळणार नाही. उलट लोहखनिजाच्या वाहतुकीतून धूळ व अपघाताचा शाप सर्वांना भोगावा लागणार आहे, असेही शेडमाके यांनी निवेदनात म्हटले आहे.
सरकारला या जिल्ह्यातील गोरगरीब, आदिवासी समाजाबद्दल थोडातरी कळवळा असेल तर झेंडेपारच्या खाणीतील लोहखनिज बाहेर नेण्याची परवानगी न देता जिल्ह्यातच लोह प्रकल्पाची उभारणी करून स्थानिक लोकांना स्थायी रोजगार द्यावा. त्यासाठी संबंधित पाचही कंपन्यांना बाध्य करावे अन्यथा सरकारला लोकांच्या रोजगाराशी त्यांच्या प्रगतीशी काही देणेघेणे नाही असे समजून आम्ही स्थानिक लोकांचे आंदोलन उभारण्याशिवाय राहणार नाही. सरकारने या संदर्भात गांभीर्याने विचार करून आपल्या संवेदनशिलतेचा परिचय द्यावा, अशीही मागणी छगन शेडमाके यांनी निवेदनातून केली आहे.






