Home गडचिरोली गडचिरोलीत शनिवारपासून प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा

गडचिरोलीत शनिवारपासून प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा

158

– आदिवासी विकास : आश्रमशाळांचे अकराशे खेळाडू दाखविणार कौशल्य

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा येथील सेमाना बायपास रोडवरील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर शनिवार, २५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. २५ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या क्रीडा संमेलनात प्रकल्पातील ३९ आश्रमशाळेतील सुमारे अकराशे आदिवासी खेळाडू सहभागी होणार असून क्रीडा कौशल्य व नैपुण्यता दाखविणार आहेत.

क्रीडा संमेलनाचे उद्घाटन खासदार अशोक नेते व आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते २५ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास विभाग नागपूरचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे राहणार आहेत. यावेळी विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी संजय मीणा, जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी आयुषी सिंह उपस्थित राहणार आहेत.

क्रीडा संमेलनात कारवाफा, भाडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटातील २४ शासकीय तर १५ अनुदानित अशा एकूण ३९ आश्रमशाळेतील खेळाडू सहभाग घेणार आहेत. १४, १७ व १९ वर्ष वयोगटात कबड्डी, खो- खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले या सांघिक खेळासह लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, धावणे या वैयक्तिक खेळाचे आयोजन केलेले आहे.

पारितोषिक वितरण पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या हस्ते २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती गडचिरोलीचे सहआयुक्त जितेंद्र चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

क्रीडा संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आलेल्या असून प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रफुल पोरेड्डीवार, अनिल सोमनकर, डॉ. प्रभू सादमवार, सुधाकर गौरकर, प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, समन्वयिका प्रमिला दहागावकर, मुख्याध्यापिका वंदना महल्ले, प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे आदींसह सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

error: Content is protected !!