– काँग्रेस जिल्हाध्यक्ष कोवासे यांची मागणी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून तुटपूंज्या सिंचन सुविधांच्या भरवशावर अनेक शेतकरी रब्बी हंगामात मका व धान पिकाचे उत्पादन घेत आहेत. दरवर्षी कमी- अधिक प्रमाणात रब्बी हंगामातील शेतमालाची खरेदी करण्यासाठी शासनस्तरावरून खरेदी केंद्र सुरू केले जात होते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून फारशी ओरड होत नव्हती. मात्र, यावर्षी पावसाळा तोंडावर येऊनही पुरेशा प्रमाणात शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तत्काळ शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे, यासोबतच गोडावूनही उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांनी केली आहे.
उन्हाळी हंगामात जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात कमी अधिक प्रमाणात मोठ्या प्रमाणावर विविध पिकांचे उत्पादन घेण्यात आली. यात प्रामुख्याने मका व धान पिकाचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अन्यथा धानाची होळी करण्याचा इशारा आंदोलनातून दिला आहे.
गडचिरोली तालुक्यातील अनेक शेतकरी मका व भात पिकाची विक्री करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्रावर चकरा मारत असल्याची ओरड आहे. तरीही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने उन्हाळी पिकाची खरेदी करण्यासाठी त्वरीत शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
येत्या काही दिवसात पावसाळ्याला सुरुवात होणार असल्यामुळे शेतकरी खरीपाच्या पूर्वमशागतीला सुरुवात करतात. पेरणीपूर्वीच खते, बियाणे व इतर व्यवस्थापन शेतकरी करीत असतात. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असतानाही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे प्रसंगी शेतकऱ्यांना सोबत घेऊन जिल्हा काँग्रेस कमिटी रस्त्यावर उतरेल, असा इशाराही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांनी दिला आहे.







