Home गडचिरोली गोसेखुर्द धरणातील पाणी वैनगंगा नदीत उद्या सोडण्यात येणार

गोसेखुर्द धरणातील पाणी वैनगंगा नदीत उद्या सोडण्यात येणार

20
Oplus_16908288

– नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर व पाणीपुरवठा सभापती लीलाधर भरडकर यांच्या पाठपुराव्याला यश

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शहरातील निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष ॲड. प्रणोती सागर निंबोरकर व पाणी पुरवठा सभापती लिलाधर भरडकर यांनी जिल्हाधिकारी व प्रशासनाचे निवेदन देऊन पाठपुरावा केला. तसेच गेल्या सहा दिवसांपासून प्रशासनाशी संपर्क करून गोसेखुर्द धरण प्रकल्पातून वैनगंगा नदीला पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी लावून धरली. या मागणीला अखेरीस आज यश आले असून ३ जूनला सकाळी सात वाजता गोसेखुर्द धरण प्रकल्पामधून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे ५ जूनपासून गडचिरोली शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या पाणी समस्येवर सहपालकमंत्री ॲड. आशिष जैस्वाल, जिल्हाधिकारी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा करून २९ मे रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी भंडारा व गोसेखुर्द प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे वैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्याची विनंती करण्यात आली. गोसेखुर्द प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनीही २९ मे रोजी यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडे सादर केला आहे.

दरम्यान, १ जून रोजी पंकज भोयर पालकमंत्री भंडारा व जिल्हाधिकारी भंडारा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्यास मंजुरी देण्यात आली. यासाठी नगराध्यक्ष ॲड. प्रणोती सागर निंबोरकर व पाणी पुरवठा सभापती लिलाधर भरडकर यांनी भंडारा पालकमंत्री पंकज भोयर, जिल्हाधिकारी भंडारा, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता तसेच कार्यकारी अभियंता गोसेखुर्द प्रकल्प यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून गडचिरोली शहरातील पाणीटंचाईची गंभीर समस्या मांडली होती. सदर प्रस्ताव 1 जूनला अधीक्षक अभियंता विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर येथे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आले. सदर प्रस्तावास 2 जून रोजी मंजुरी देण्यात आली असून, ३ जून सकाळी सात वाजतापासून गोसेखुर्द धरणातून 25.00 दशलक्ष घन मीटर पाणी सोडण्याची प्रक्रिया होणार आहे. कार्यकारी अभियंता गोसेखुर्द धरण प्रकल्प यांनी असे आदेश पारित केले आहे.

गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी वैनगंगा नदीला सोडल्यानंतर ते अडविण्यासाठी नगर परिषदेकडून वैनगंगा नदीपात्रात माती व रेती टाकून तात्पुरत्या बंधाऱ्याचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. ३ जूनपर्यंत हे काम पूर्ण होणार असून त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गोसेखुर्द धरण प्रकल्प क्षेत्रातून 30 जूनपर्यंत टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात येणार आहे.

नदीपात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी

गोसीखुर्द धरणामधून उद्या, 3 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजेपासून धरण पायथा विद्युत गृहमधून वैनगंगा नदीपात्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याकरिता 40 क्युमेक्स विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. या विसर्गमध्ये आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने वाढ होऊ शकते. तरी नदीपात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावे. सर्व यंत्रणांनी कृपया आवश्यक ती संपुर्ण खबरदारी बाळगून सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या स्तरावरुन तसे सर्व संबंधितांना त्वरित सूचित करावे, असे कळविण्यात येत आहे.

error: Content is protected !!