– महाराष्ट्र पोलीस भरतीतील १२ वीरांसह गुणवंतांचा गौरव
– माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते सत्कार
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सोहळा संपन्न
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : स्थानिक शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली येथे १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र पोलीस भरती २०२६ मध्ये निवड झालेल्या महाविद्यालयाच्या १२ विद्यार्थ्यांचा आणि इयत्ता अकरावीमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंतांचा सत्कार या महाविद्यालयाचे संस्थापक तसेच माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते करण्यात आले.
यशाचे शिखर आणि देशसेवेचा संकल्प
शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय हे आपल्या दर्जेदार शिक्षण आणि शिस्तीसाठी ओळखले जाते. यावर्षी महाविद्यालयाच्या तब्बल १२ विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन महाराष्ट्र पोलीस दलात आपली जागा निश्चित केली आहे. यामध्ये ओमकांत चौधरी, युनिक बोरकर, विशाल गव्हारे, सुरज चापले, वीरेंद्र आत्राम, ओम वलादे, पियुष कडामी, आकाश अंबादे, शुरवील कांबळे आणि रजनी मितवार यांच्यासह अन्य यशस्वी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. खांद्यावर मानाची वर्दी चढवणाऱ्या या ‘खाकी’च्या शिलेदारांचा गौरव करताना उपस्थितांच्या टाळ्यांनी सभागृह दुमदुमून गेले होते.
विद्यार्थ्यांनी देशाच्या आणि समाजाच्या सेवेसाठी तत्पर राहावे : डॉ. अशोकजी नेते
याप्रसंगी बोलताना संस्थचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते म्हणाले की, “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे आणि त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज करणे हेच या महाविद्यालयाचे मुख्य ध्येय आहे. आज पोलीस दलात निवड झालेले विद्यार्थी हे केवळ महाविद्यालयाचाच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान आहेत. विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी न मिळवता, देश आणि समाजाची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर राहावे.” महाविद्यालयाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आणि शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरणाचेही त्यांनी यावेळी भरभरून कौतुक केले.
गुणवंतांचाही सन्मान
केवळ पोलीस भरतीच नव्हे, तर शैक्षणिक क्षेत्रातही महाविद्यालयाने आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. इयत्ता अकरावीमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यालयाच्या यशाचे हे श्रेय प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यांना जाते, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.
या सोहळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य दुर्गम, प्रा. नरेंद्र मोहुर्ले, प्रा. जाडे, प्रा. वाटेकर, प्राध्यापिका रोहनकर, प्राध्यापिका पिंपळशेट्टीवार, प्राध्यापिका मानकर, प्राध्यापिका डोर्लीकर, प्राध्यापिका देशमुख, प्राध्यापिका मडावी, महादेव पिंपळशेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचारी शेट्टे, संतोषवार, कांबळे, रोहनकर, हावलादार, दिवसे, नाव्होरीकर आणि सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.







