Home गडचिरोली लॉयड्सच्या खेळाडूंची दमदार कामगिरी ; राज्य आणि जिल्हास्तरावर अनेक पदकांची कमाई

लॉयड्सच्या खेळाडूंची दमदार कामगिरी ; राज्य आणि जिल्हास्तरावर अनेक पदकांची कमाई

44

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : लॉयड्स स्पोर्ट्स अकादमी आणि लॉयड्स राज विद्या निकेतन (एलआरव्हीएन) शाळेच्या खेळाडूंनी अलीकडे झालेल्या राज्य व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत अनेक पदके जिंकली आहेत. Brahmapuri Sports Festival 2026 अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा तसेच गडचिरोली येथील जिल्हास्तरीय तिरंदाजी स्पर्धेत त्यांनी चमकदार कामगिरी केली.

चंद्रपूर येथे ब्रह्मपुरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित स्पर्धेत अंडर-18 मुलींच्या गटात लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीची खेळाडू मोनिका मडावी हिने लांब उडीमध्ये सुवर्णपदक आणि 100 मीटर धावण्यात रौप्यपदक पटकावत दुहेरी यश मिळवले. एलआरव्हीएन शाळेची विद्यार्थिनी भाग्यश्री मुलमा हिने अंडर-14 मुलींच्या गटात गोळाफेक स्पर्धेत सुवर्णपदक आणि 100 मीटर धावण्यात कांस्यपदक जिंकत आपली बहुगुणी क्षमता सिद्ध केली.

गडचिरोली येथील पायलट प्रोजेक्ट आर्चरी सेंटरमध्ये पार पडलेल्या अंडर-15, अंडर-13 आणि अंडर-10 जिल्हास्तरीय तिरंदाजी स्पर्धेतही लॉयड्सच्या खेळाडूंनी यश संपादन केले. विशेष म्हणजे शालेय गटातील सर्व पदक विजेते एलआरव्हीएन शाळेचेच होते. अंडर-15 मुलींच्या गटात पल्लवी सुरेश गोडसेलवार हिने सुवर्णपदक तर पूर्वी विकास देबनाथ हिने रौप्यपदक जिंकले. अंडर-15 मुलांच्या गटात सागर सुब्रत सरकार याने सुवर्णपदक पटकावले. अंडर-13 गटात उज्ज्वल दिनेश दास याने कांस्यपदक, तर अंडर-10 गटात अनिश बुधन सिंकू याने रौप्यपदक जिंकले.

लॉयड्स स्पोर्ट्स अकादमी, कोन्सारी येथील खेळाडूंनीही उल्लेखनीय कामगिरी केली. सौरभ राऊत याने अंडर-15 मुलांच्या (डिस्टन्स व इंडिव्हिज्युअल) गटात कांस्यपदक मिळवले, तर गौरी गावतुरे हिने अंडर-15 मुलींच्या गटात डिस्टन्स प्रकारात द्वितीय आणि इंडिव्हिज्युअल प्रकारात तृतीय क्रमांक मिळवला.

संरचित प्रशिक्षण, व्यावसायिक मार्गदर्शन, आधुनिक सुविधा आणि शिस्तबद्ध वातावरण या मजबूत क्रीडा पायाभूत व्यवस्थेमुळे लॉयड्सचे खेळाडू सातत्याने यश संपादन करत आहेत. ग्रामीण आणि आदिवासी भागातील प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने लॉयड्सकडून क्रीडा विकासासाठी सातत्याने गुंतवणूक केली जात आहे.

Lloyds Metals and Energy Limited चे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन यांच्या दूरदर्शी विचारसरणीचा अवलंब करत लॉयड्सने स्थानिक युवकांसाठी अत्याधुनिक क्रीडा सुविधा विकसित केल्या आहेत. आता या सुविधांचे सकारात्मक परिणाम स्पष्टपणे दिसून येत असून खेळाडू जिल्हा व राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत आहेत.

error: Content is protected !!