Home गडचिरोली मौशिखांब ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावात सुसज्ज अभ्यासिका सुरू

मौशिखांब ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावात सुसज्ज अभ्यासिका सुरू

42
Oplus_16908288
मुख्यमंत्री पंचायतराज अभियान ; स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गावातच मिळणार सुविधा
– परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली तालुक्यातील मौशिखांब ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून ‘मुख्यमंत्री पंचायतराज अभियान’ अंतर्गत गावातच एक सुसज्ज व अत्याधुनिक अभ्यासिका (Study Room) सुरू केली आहे. या स्तुत्य उपक्रमामुळे ग्रामीण भागातील होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी व उच्च शिक्षणासाठी मोलाची मदत होणार आहे. आता गावातच अत्याधुनिक सुविधा मिळणार असल्याने या भागातील विद्यार्थ्यांना शहराकडे धाव घेण्याची गरज नाही.

ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार, बुद्धिमान असून सुद्धा शांत वातावरण, बसण्यासाठी पुरेशी जागा आणि वीज यासारख्या पायाभूत सुविधांअभावी विद्यार्थी शिक्षणात मागे पडतात. शहरांमधील खाजगी वाचनालयांचे शुल्क त्यांना परवडत नसल्याने अनेकांचे शिक्षण अर्धवट राहते. हीच अडचण लक्षात घेत मौशिखांब ग्रामपंचायतीने नवीन अभ्यासिका सुरू केली आहे. या अभ्यासिकेत प्रशस्त बैठक व्यवस्था, एकाग्रतेने अभ्यासासाठी स्वतंत्र डेस्क आणि खुर्च्या, पायाभूत सोयी, अखंडित प्रकाशयोजना, पंखे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुरक्षित वातावरण, विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित अभ्यासाची जागा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्रामीण शिक्षण क्षेत्रात मैलाचा दगड ठरणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची दारे उघडण्यास मदत करणार आहे. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर अभ्यासिकेच्या शुभारंभाप्रसंगी सरपंच रंजिता पेंदाम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या, या अभ्यासिकेचा उपयोग केवळ वाचनासाठी न करता, स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करून गावाचे नाव उंचावण्यासाठी करावा. वाचनाच्या सवयीमुळे अभ्यासाप्रती गोडी निर्माण होते व ज्ञानात भर पडेल, असे त्यांनी सांगितले.

उपसरपंच रुपाली गांधरवार यांनी हा उपक्रम गावाच्या शैक्षणिक क्रांतीची सुरुवात असल्याचे सांगितले. ग्रामविकास अधिकारी खुशाल नेवारे म्हणाले, शासनाच्या विविध योजनांचा निधी विधायक कामांसाठी वापरून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे. अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांचा व गावाचा विकास होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या प्रेरणादायी सोहळ्याला ग्रामपंचायत सदस्य विकास उंदीरवाडे, जयकुमार खेडेकर, सुधाकर गेडाम, तंटामुक्ती अध्यक्ष गणेश दहलकर उपस्थित होते. दहलकर यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम आणि शिस्तीचे महत्त्व पटवून दिले. मौशिखांब ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे जिल्हाभरातून कौतुक होत असून इतर ग्रामपंचायतींसाठी हा ‘रोल मॉडेल’ ठरत आहे.

error: Content is protected !!