Home गडचिरोली आश्रमशाळेतील १ हजार २२२ शिक्षकांना मिळणार थकबाकी वेतन

आश्रमशाळेतील १ हजार २२२ शिक्षकांना मिळणार थकबाकी वेतन

131

– पंचवीस वर्षांपासून सुरू होता लढा : आमदार सुधाकर अडबाले यांच्या प्रयत्नाला यश

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आश्रम शाळेतील मान्यता प्रलंबित असलेल्या १ हजार ४३३ शिक्षकांपैकी १ हजार २२२ शिक्षकांना शासनाकडून नियुक्तीच्या दिनांकापासून विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आलेली होती. परंतु थकीत वेतनाचा प्रश्न निकाली न निघाल्यामुळे गेल्या २५ वर्षांपासून या मागणीसाठी लढा देण्यात आला. आता वित्त विभागाची मंजुरी मिळाल्यामुळे सदर कर्मचाऱ्यांना थकबाकी वेतन मिळणार आहे. यासाठी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा केला.

काही कर्मचाऱ्यांनी थकबाकी वेतन मिळण्याबाबत न्यायालयात भाव धरली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार सदर १ हजार २२२ कर्मचाऱ्यांना थकबाकी वेतन अदा करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त नाशिक यांच्याकडून शासनास पाठविण्यात आले होते. थकबाकी वेतन मिळण्यासाठी अनुदानित आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांच्या वतीने गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने लढा सुरू होता. सदर प्रकरण शासनस्तरावर थंडबस्त्यात होते.अनुदानित आश्रम शाळेतील सदर कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी संघटनेने वेळोवेळी अपर आयुक्त, आयुक्त तसेच मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला.
याप्रकरणी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी संघटनेला ठोस आश्वासन दिले होते.शासनस्तरावरुन १ हजार ४३३ शिक्षक कर्मचाऱ्यांना थकबाकी वेतन मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असे म्हणत विधिमंडळात प्रामुख्याने हा विषय वारंवार लावुन धरला.प्रश्न तत्काळ निकाली काढण्यात यावे, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी केली होती. आता १ हजार २२२ पैकी सध्या कार्यरत असलेल्या १ हजार ५१ शिक्षक कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या दिनांकापासून थकबाकी वेतन मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

सदर कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या दिनांकापासून थकबाकी वेतन मिळावे या मागणीसाठी सीटू संलग्नित आदिवासी विकास आश्रम शाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष रामदास खवशी, अनुदानित आश्रमशाळा संघटना सचिव विकास जनबंधू , विभागीय उपाध्यक्ष यादव धानोरकर, पुरुषोत्तम डोंगरवार, किसनदेव टिकले, रमेश कोरचा, सचिन खोब्रागडे व इतर पदाधिकारी यांनी सातत्याने प्रयत्न केले.

error: Content is protected !!