– अजितदादा पवारांना लिलाधर भरडकर यांची भावपूर्ण श्रद्धांजली
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : सामान्य कुटुंबातील युवकांना राजकारणात काम करण्याची संधी देत, राजकारणासोबत समाजकारणाची जाणीव रुजवणारे आणि राज्यातील विकास कामांचे कणखर नेतृत्व असलेले नेते अजित दादा पवार आपल्यात नाहीत, ही बाब मनाला चटका लावणारी असून आजही या घटनेवर विश्वास बसत नाही, असे भावनिक उद्गार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष तथा न. प. पाणी पुरवठा सभापती लिलाधर भरडकर यांनी काढले.
राज्यातील युवकांना दिशा देणारे, त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना नेतृत्वाची संधी देणारे दादा म्हणजे उभ्या महाराष्ट्रासाठी आवश्यक असलेले दूरदृष्टीचे नेतृत्व होते. सामान्य कार्यकर्त्यांपासून ते युवकांपर्यंत प्रत्येकाला आपलेपणाची वागणूक देत, विकासाला प्राधान्य देणारी राजकीय भूमिका त्यांनी कायम जपली, असेही भरडकर यांनी सांगितले.
अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवकांना राजकीय प्रवाहात येण्याची प्रेरणा मिळाली. पक्षासाठी काम करत असतानाच समाजासाठीही योगदान देता येते, ही शिकवण त्यांनी आपल्या कृतीतून दिली. त्यामुळे आज त्यांच्या जाण्याने केवळ एक नेता नव्हे, तर मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि विकासाचा ध्यास घेणारे व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
“असे नेतृत्व पुन्हा मिळणे कठीण आहे. त्यांच्या आठवणी आणि कार्य कायम प्रेरणादायी राहील,” अशा शब्दांत लिलाधर भरडकर यांनी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.







