– शहर विकासाला नवी दिशा
– नगराध्यक्ष प्रणोती निबोंरकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : नगराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण अशी घडामोड घडली असून नगरसेवक अनिल कुनघाडकर यांची नगर परिषद बांधकाम सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्ष प्रणोती निबोंरकर यांनी अनिल कुनघाडकर यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या निवडीमुळे नगरातील विकासकामांना नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अनिल कुनघाडकर हे नगरपरिषदेतील अनुभवी, अभ्यासू आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी नगर परिषद उपाध्यक्ष या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली आहे. त्यांच्या कार्यकाळात शहरातील अनेक विकासकामे मार्गी लागली असून, नागरी प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रभावी भूमिका बजावली होती.
नगरपरिषदेत दीर्घ अनुभव, प्रशासकीय कामकाजाची सखोल जाण, नागरिकांशी असलेला थेट संवाद आणि विकासाभिमुख दृष्टिकोन या सर्व बाबी लक्षात घेता त्यांची बांधकाम सभापतीपदी निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या नियुक्तीमुळे नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाला सक्षम नेतृत्व मिळाले आहे.
बांधकाम सभापती म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर अनिल कुनघाडकर यांनी सांगितले की, “शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व नवीन रस्ते बांधकाम, नाले व गटारी व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, नागरी सोयी-सुविधा तसेच विकासकामांमध्ये गुणवत्ता व पारदर्शकता यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. शहराच्या विकासात कोणतीही तडजोड न करता नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील.”
या नियुक्तीनंतर नगरपरिषदेतील सर्व सदस्य, पदाधिकारी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी अनिल कुनघाडकर यांचे अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव केला. नगराध्यक्ष प्रणोती निबोंरकर यांनीही त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करत सांगितले की, नगराच्या विकासासाठी त्यांच्या अनुभवाचा निश्चितच फायदा होईल.
अनिल कुनघाडकर यांची बांधकाम सभापतीपदी नियुक्ती ही नगराच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल, अशी भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत असून, येत्या काळात नगरात दर्जेदार व नियोजनबद्ध विकासकामे पाहायला मिळतील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.







