– प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलनाचे थाटात उद्घाटन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : अभ्यासाबरोबरच खेळाकडे विशेष लक्ष द्यावे. खेळामधील खेळाडूवृत्तीतून जीवनातील चढ उताराला सामोरे जाण्याची शक्ती प्राप्त होऊन यश मिळते. छत्तीसगड राज्यातील अनिमेष कुजूर या आदिवासी धावपटूने राष्ट्रीय स्तरावरील शंभर मीटर धावणे स्पर्धेतील रेकॉर्ड मोडला. ही बाब आदिवासीबहुल जिल्ह्यासाठी अतिशय भूषणावह आहे. जिल्ह्यातील आदिवासी खेळाडू क्रीडा गुणांनी निपुण असल्यामुळे यातून प्रेरणा घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी खेळाडूंनी गावपातळीपासून राष्ट्रीयस्तरापर्यंत व पुढे आंतरराष्ट्रीयस्तरावर आपले नावलौकिक करावे, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांनी केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत गडचिरोली प्रकल्प स्तरीय तीन दिवसीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन येथील सेमाना बायपास रोडवरील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर बुधवार, १९ नोव्हेंबर रोजी क्रीडाज्योत प्रज्वलित करून थाटात पार पडले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. प्रभू सादमवार, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा उर्मिला सिडाम, उपाध्यक्ष रोशन कुमरे, मुख्याध्यापिका वंदना महल्ले, प्राचार्य परशुराम वांगदरे, अनिल सोमनकर, मंगेश ब्राह्मणकर, सुनील नन्नेवार, प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, क्रीडा समन्वयिका प्रमिला दहागावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम दरम्यान शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेतील मुलींने पारंपरिक आदिवासी नृत्य सादर केले. १७ वर्षीय मुलांचा व्हॉलीबॉलचा उद्घाटनीय सामना सोडे व कोरची या बिट संघादरम्यान झाला. यात कोरची संघ विजयी ठरला. संमेलनात कारवाफा, भाडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटातील २४ शासकीय तर १७ अनुदानित अशा एकूण ४१ आश्रमशाळेतील सुमारे अकराशे खेळाडूंचा सहभाग आहे.१४, १७ व १९ वर्ष वयोगटात सांघिक व वैयक्तिक खेळाचे आयोजन केलेले आहे.या स्पर्धांमधून आदिवासी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त क्रीडा कौशल्य प्रदर्शित होणार आहे.
सहभागी खेळाडूंना समीक्षा वरखडे यांनी तर पंचांना नेताजी गावळ यांनी शपथ दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका वंदना महल्ले यांनी केले. संचालन संतोष कन्नाके तर आभार प्रदर्शन अतुल बलगुजर यांनी केले. क्रीडा वृत्तलेखन प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अधीक्षक देविदास चोपडे, अधिक्षिका निमा राठोड, गुलाब डोंगरवार, निलेश कळंब, डाकराम धोंगडे,सविता शेंडे, रामदास पिल्लारे, शारदा कोटांगले, दिनेश येरमे, भूषण खोब्रागडे, जागृती टेकाम, पाचही बिटातील क्रीडा निरीक्षक आशिष नंदनवार, रविकांत पिपरे, सुधीर म्हशाखेत्री, संतोष गैनवार, अजय वाकडे, जितू खोब्रागडे, नवाज शहा, संदीप उसेंडी, कृपांती बोरसरे, प्रवीण पोटावी, शैलेश भैसारे, राजेश लांडगे, कार्तिकस्वामी जावळे, गणेश लेनगुरे, भूपेंद्र गेडाम आदींसह क्रीडा शिक्षक, विविध समितीचे कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.कार्यक्रमास कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.







