Home गडचिरोली भाजपमध्ये ‘ठेकेदार प्रयोग’ सुरू ; कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे सूर

भाजपमध्ये ‘ठेकेदार प्रयोग’ सुरू ; कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे सूर

89

– एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना संधी ; चुकीच्या निर्णयावर भाजपमध्ये वादळ

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये नवा सत्तासंघर्ष उभा राहिला आहे. पक्षातील एकनिष्ठ आणि अनेक वर्षे परिश्रम घेणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून, बाहेरून आलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे. भाजपमध्ये आता ठेकेदार प्रयोग’ सुरू झाल्याचा कार्यकर्त्यांमध्ये सूर उमटत आहे. या घडामोडींनी गडचिरोली भाजपमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पक्षातील अनेक वरिष्ठ कार्यकर्त्यांनी आमदारांच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “पक्षाशी निष्ठा ठेवणाऱ्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे” असा सूर कार्यकर्त्यांतून उमटत आहे.

योगिता पिपरे यांच्यावर अन्याय? ; एकनिष्ठ कार्यकर्त्यांना वंचित ठेवण्याची चर्चा

गडचिरोली शहरात विकासाची नवी दिशा दाखवणाऱ्या पिपरे दाम्पत्याने गेल्या काही वर्षांत नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक भरीव कामे केली. शंभर कोटींच्या गटार लाईन प्रकल्पाची अंमलबजावणी, सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण, शहराचे सौंदर्यीकरण, तसेच नागरिकांसाठी मुलभूत सुविधा निर्माण करण्याचे ध्येय या सर्व उपक्रमांमुळे शहरात विकासाचा नवा अध्याय लिहिला गेला.

“भाजपने चुकीचा निर्णय घेतला तर काँग्रेसला सत्ता रेडीमेड मिळेल”

शहरातील नागरिक आणि राजकीय जाणकारांचे स्पष्ट मत आहे की, भाजपने जर बाहेरून आलेल्या उमेदवारावर विश्वास ठेवला, तर याचा थेट फायदा काँग्रेसला होणार आहे. गेल्या काही वर्षांत पिपरे दाम्पत्याने जो जनाधार निर्माण केला आहे, तो गमावल्यास भाजपला पुन्हा सत्ता मिळवणे कठीण होईल, अशी चर्चा शहरभर रंगली आहे. काही वरिष्ठ कार्यकर्त्यांनी तर उघडपणे सांगितले की, “हा निर्णय पक्षासाठी आत्मघात ठरेल. ठेकेदारांच्या बळावर नगरपालिका जिंकता येत नाही, जनता काम पाहते, पैसा नाही.” पक्षात गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या नेत्यांचा सन्मान राखण्याऐवजी बाहेरून आलेल्यांना पद देणे हा पक्षाच्या तत्त्वांना धरून नसल्याचा आरोपही केला जात आहे.

भाजपसमोर आता द्विधा परिस्थिती ; कार्यकर्त्यांवर विश्वास की पैशावर भरोसा?

गडचिरोली नगरपालिकेची निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे. एकीकडे पिपरे दाम्पत्यासारखे अनुभवी आणि जनाधार असलेले कार्यकर्ते आहेत, तर दुसरीकडे बाहेरून आलेल्या पैशाच्या बळावरचे उमेदवार. भाजपने चुकीचा निर्णय घेतल्यास, कार्यकर्त्यांच्या मनातील नाराजीचा फटका थेट मतपेटीत बसू शकतो. राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे की, भाजपने जर एकनिष्ठ, जनतेशी जोडलेले आणि विकासाभिमुख नेतृत्व पुढे केले, तर गडचिरोलीत भगवा पुन्हा फडकेल, अन्यथा सत्ता गमावणे अपरिहार्य ठरेल, असा सूर कार्यकर्ते व नागरिकांमध्ये उमटत आहे.

error: Content is protected !!