– मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व पथसंचलनात सहभाग
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : “संघ शताब्दी वर्ष १९२५–२०२५ भारत माता की जय!” या दणदणीत घोषणांनी शनिवारी गडचिरोली शहराचे वातावरण देशभक्तीच्या उन्मेषाने भारून गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त व विजया दशमी उत्सवानिमित्त आयोजित भव्य पथसंचलनात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांचे पारंपरिक सन्मानाने व देशप्रेमाच्या भावनेने स्वागत करण्यात आले.
या सोहळ्याचे औचित्य साधत माजी खासदार तथा भारतीय जनता पक्ष अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून वंदन करण्यात आले. त्यानंतर पथसंचलनात सहभागी होऊन स्वयंसेवकांवर पुष्पवर्षाव करत ‘भारत माता की जय’ व ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला.

हा स्वागत सोहळा चामोर्शी रोडवरील मा. खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात तसेच रेड्डी गोडावून चौक येथे भव्यतेने पार पडला. संघगीताचे सुरेल स्वर आणि स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध संचलनाने परिसर राष्ट्रभक्तीच्या भावनेने ओथंबून गेला होता.
याप्रसंगी मा. खा. डॉ. नेते यानी संघ संस्थापक डॉ. हेडगेवार व गुरुजी गोलवलकर यांच्या कार्याचे स्मरण करत म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही केवळ एक संघटना नसून ती राष्ट्रनिर्माणाची अखंड साधना आहे. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार व प. पू. गुरुजी गोलवलकर यांनी रुजवलेले देशभक्तीचे बीज आज शताब्दी वर्षानिमित्त अजूनही त्या जोमाने राष्ट्रसेवेची प्रेरणा देत आहे, असेही नेते म्हणाले.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने संघ स्वयंसेवक, समाजभक्त नागरिक, व्यापारी, महिला आणि समाजसेवक कार्यकर्ते उपस्थित होते. जयघोष, संघगीत आणि शिस्तबद्ध पथसंचलनामुळे गडचिरोलीचे वातावरण राष्ट्रभक्तीच्या तेजाने उजळून निघाले.







