Home गडचिरोली १ ऑगस्टला जिल्हा काँग्रेसचे ‘भीक मांगो’ आंदोलन

१ ऑगस्टला जिल्हा काँग्रेसचे ‘भीक मांगो’ आंदोलन

77
Oplus_16908288
– वैद्यकीय महाविद्यालयासाठी स्वतंत्र जागा व शासकीय भरतीची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली येथे महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्वतंत्र इमारत अद्यापही अस्तित्वात न आल्याने गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि वैद्यकीय महाविद्यालयासाठी स्वतंत्र जागा व शासकीय भरतीच्या मागणीसाठी उद्या, १ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १ वाजता इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात येणार आहे.

काँग्रेसने सरकारवर निष्क्रियतेचा आरोप केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गडचिरोलीचे पालकमंत्री असताना आणि त्यांच्या सोबतीला सहपालकमंत्री आशिष जयस्वाल असे दोन पालकमंत्री जिल्ह्यात असतानाही वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वतंत्र इमारतीसाठी जागा उपलब्ध होत नाही हा मोठा गंभीर प्रश्न आहे. ही परिस्थिती सरकारच्या अनास्थेचे प्रतीक असल्याचे काँग्रेसने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

सदर वैद्यकीय महाविद्यालयात खाजगी कंपनीमार्फत नोकर भरती सुरू करण्यात आली असली तरी ही प्रक्रिया आजतागायत पूर्ण झालेली नाही. यामुळे जिल्ह्यातील अनेक पात्र तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. ही भरती शासकीय यंत्रणेमार्फत पार पाडण्यात यावी, अशी प्रमुख मागणीही काँग्रेसने केली आहे.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सांगितले की, ‘भीक मांगो’ आंदोलनाद्वारे गोळा झालेला निधी शासनाला दिला जाईल, जेणेकरून त्या माध्यमातून तरी सरकारने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वतंत्र इमारतीसाठी जागा खरेदी करावी. या आंदोलनात जिल्ह्यातील युवक, विद्यार्थी, काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!