Home गडचिरोली कमलापूर हत्ती कॅम्पला ‘राज्य पर्यटनस्थळ’ घोषित करा

कमलापूर हत्ती कॅम्पला ‘राज्य पर्यटनस्थळ’ घोषित करा

69

– भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव असलेल्या अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील हत्ती कॅम्पला ‘राज्य पर्यटनस्थळ’ म्हणून घोषित करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भ्रष्टाचार निवारण समिती गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.

सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेला असून या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे, त्याबद्दल नागरिक त्यांचे सदैव ऋणी आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्याची धुरा सांभाळल्यापासून जिल्ह्याकडे विशेष लक्ष दिले असून, मोठे उद्योग सुरू झाल्याने रोजगार निर्मिती झाली आहे. मात्र शैक्षणिक मागासलेपणामुळे स्थानिकांना तांत्रिक शिक्षणाअभावी उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी कमी मिळत आहेत.

कमलापूर येथील हत्ती कॅम्प हे राज्यातील एकमेव ठिकाण आहे. सन २०१६ मध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी या कॅम्पला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते आणि विकासासाठी निधीही प्राप्त झाला होता. परंतु २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाल्याने हत्ती कॅम्पकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. मध्यंतरी या कॅम्पमधील हत्ती गुजरात येथील खासगी ट्रस्टकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय वनखात्याने घेतला होता. मात्र आपण, स्थानिक जनता आणि वन्यजीवप्रेमींनी याला मोठ्या प्रमाणात विरोध केल्याने, उच्च न्यायालयाने स्वतः दखल घेऊन हत्तींचे स्थलांतर थांबवले होते. कमलापूर येथील हत्ती कॅम्प हे स्थानिक रोजगाराचे सर्वात मोठे स्त्रोत आहे. या कॅम्पला राज्य पर्यटनाचा दर्जा दिल्यास परदेशातून, देशातून तसेच राज्यातून पर्यटक येतील. ज्यामुळे स्थानिक नागरिकांचे किरकोळ व्यवसाय सुरू होतील आणि जिल्ह्यातील शैक्षणिकदृष्ट्या बेरोजगार युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी आशाही ताटीकोंडावार यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी राज्याचे गृहमंत्रीपद स्वीकारल्यापासून जिल्ह्यात बेकायदेशीर कृत्यांना आळा बसला असून, घातपात करणारे कृत्य बंद झाले आहे. त्यामुळे कमलापूर येथील हत्ती कॅम्पला पर्यटनाचा दर्जा देण्यास कोणताही अडथळा नाही. हत्ती कॅम्पला पर्यटनस्थळ घोषित केल्यास तिथे बोटींग, विश्रामगृह तसेच इतर सोयी-सुविधांचे बांधकाम करण्यात येईल. ज्यामुळे राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळेल आणि राज्याच्या आर्थिक प्रगतीला हातभार लागेल, असेही ताटीकोंडावार यांनी निवेदनात नमूद केले आहे.

error: Content is protected !!