Home गडचिरोली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात गडचिरोलीत उद्या ‘शेतकरी न्याय यात्रा’

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात गडचिरोलीत उद्या ‘शेतकरी न्याय यात्रा’

138

– 10 हजार शेतकरी होणार सहभागी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ हे उद्या, 12 जून 2025 रोजी गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या नेतृत्वात ‘शेतकरी न्याय यात्रा’ काढण्यात येणार आहे. ही यात्रा इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडली जाणार आहे.

या शेतकरी न्याय यात्रेत या शेतकरी न्याय यात्रेत विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेते आ. विजय वड्डेटीवार, खासदार डॉ. नामदेव किरसान, अखिल भारतीय काँग्रेस सचिव कुणाल चौधरी, माजी खा. मारोतराव कोवासे,  आ. रामदास  मसराम, आ. अभिजीत भाऊ वंजारी, आ. सुधाकर अडबाले, निरीक्षक सचिन नाईक, मनोहर पाटील पोरेटी यांच्यासह  वरिष्ठ नेते व पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकरी बांधव, युवक, महिला, काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत, असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.

शेतकरी न्याय यात्रेतील प्रमुख मागण्या

शासनाने बोनसची घोषणा करूनही अद्याप बोनस वितरित झालेला नाही, त्वरित शेतकऱ्यांना बोनस देण्यात यावा, रानटी हत्ती व इतर वन्य प्राण्याच्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसान भरपाईत 50 हजाराहून 1 लक्ष रुपये पर्यंत वाढ देण्यात यावी किंवा अधिक नुकसान झाल्यास नुकसानीच्या तुलनेत मदत देण्यात यावी, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित आर्थिक भरपाई दिली जावी, गडचिरोलीत विमानतळासाठी शेतकऱ्यांची सुपीक जमीन अधिग्रहित करू नये; त्याऐवजी इतर पर्यायी वनजमिनीचा वापर करण्यात यावा, नवीन उद्योगांसाठी जमिनी अधिग्रहित करताना शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, जिल्ह्यातील डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना विद्युत मीटर देऊन 24 तास स्वतंत्र शेतीकरीता वीज पुरवठा देण्यात यावा, वनपट्टे न मिळालेल्या शेतकऱ्यांना सात पिढ्यांची अट शिथिल करून कायमस्वरूपी वनपट्टे द्यावेत, खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना बी-बियाणे, खत व कर्जाच्या योजनांत सुलभता देण्यात यावी, सुरजागड व कोनसरी येथील स्थानिक प्रकल्पामध्ये जिल्ह्यातील स्थानिकांना 80% जागा आरक्षित करून नोकरी देण्यात याव्या, मान्सूनपूर्व जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गसह जिल्हा मुख्यालयाला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचे तातडीने काम पूर्ण करण्यात यावे, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मान्सून पूर्व आवश्यक त्या अत्यावश्यक सेवा औषध पुरवठा डॉक्टर वन नर्सेससह उपलब्ध करून देण्यात यावे आदींचा समावेश आहे.

error: Content is protected !!