– आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके राहणार उपस्थित : ९ प्रकल्पातील हजारांवर कर्मचाऱ्यांचा होणार संवाद
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना (सिटू संलग्न) महाराष्ट्र राज्य नाशिक या संघटनेच्या नागपूर विभागाच्या वतीने शुक्रवार, १८ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता नागपूर येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलन सांस्कृतिक सभागृहात भव्य विभागीय अधिवेशनाचे आयोजन केलेले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते होणार आहे. अधिवेशनात गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी व भामरागड या तीन प्रकल्पासह नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, देवरी, भंडारा, चंद्रपूर, चिमूर अशा एकूण ९ प्रकल्पातील हजारावर शिक्षक व कर्मचारी उपस्थित राहून संवाद कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे (भाप्रसे), नागपूर विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह (भाप्रसे), संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड उपस्थित राहणार आहेत. सत्कारमूर्ती म्हणून नागपूर विभागाचे सेवानिवृत्त अपर आयुक्त रवींद्र ठाकरे (भाप्रसे), ज्योत्स्ना ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी अमरावती विभागाचे अपर आयुक्त जितेंद्र चौधरी, नागपूर विभागाचे उपआयुक्त डिगांबर चव्हाण, गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी रणजित यादव (भाप्रसे), अहेरीचे प्रकल्प अधिकारी कुशन जैन (भाप्रसे), भामरागडचे प्रकल्प अधिकारी नमन गोयल (भाप्रसे), नागपूरचे प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर, चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, वर्धाचे प्रकल्प अधिकारी दीपक हेडाऊ, भंडाराचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे, चिमूरचे प्रकल्प अधिकारी प्रवीण लाटकर, देवरीचे प्रकल्प अधिकारी उमेश काशिद आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
विशेष निमंत्रित म्हणून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, वेतन पडताळणी पथक नागपूरचे लेखाधिकारी शैलेश कोठे तर स्वागताध्यक्ष म्हणून विजूक्टा संघटनेचे महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर, सहस्वागताध्यक्ष म्हणून किट्स इंजीनियरिंग कॉलेज रामटेकचे प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रा. बी. टी. भामरे, ज्येष्ठ मार्गदर्शक व सल्लागार रमेशचंद्र दहिवडे, अमरावती विभागीय अध्यक्ष डॉ. अशोक झुंजारे, नाशिक विभागीय अध्यक्ष प्रा. अमोल वाबळे, ठाणे विभागीय अध्यक्ष प्रा. प्रमोद पोगेरे, राज्य कोषाध्यक्ष प्रा. शरद बिरादार, नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास खवशी, नागपूर विभागीय सचिव प्रा. अमृत मेश्राम, राज्य सचिव तथा महिला आघाडी प्रमुख करुणा लांजेवार आदींची उपस्थिती लाभणार आहे.
अधिवेशनात पहिल्या चर्चासत्रात शिक्षकांचे प्रश्न आणि संघटनेची भूमिका यावर चर्चा होणार आहे तर शिक्षणातील बदल आणि भविष्यातील दिशा या विषयावर चर्चासत्र २ चे आयोजन केले आहे. विभागीय अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू करणे, आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या भोजनाची वेळ सकाळी १० वाजता करणे यासह अनेक मागण्यांसाठी आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटित शक्तीचे प्रदर्शन होणार आहे. विभागीय अधिवेशनाला आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास खवशी यांनी केले आहे.







