Home गडचिरोली फुटपाथ धारकांच्या रोजगाराची सोय करा ; अन्यथा आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करणार

फुटपाथ धारकांच्या रोजगाराची सोय करा ; अन्यथा आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करणार

112
Oplus_131072

– शेतकरी कामगार पक्षाचा इशारा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : रस्त्याच्या कडेला फुटकळ व्यवसाय करणाऱ्यांच्या टपऱ्यांचे अतिक्रमण हटविल्याने हजारो कुटूंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून ज्यांच्या टपऱ्या हटविण्यात आल्या, त्यांना व्यवसायासाठी तातडीने पर्यायी सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गुजराती – मारवाड्यांच्या मोठ्या दुकानांना फायदा मिळण्यासाठी स्थानिक गरीब भूमिपुत्रांचे फुटपाथ दुकाने आमदार डाॅ. मिलिंद नरोटे यांच्या पुढाकाराने नगर परिषदेने हटविले. शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अतिक्रमण हटविणे क्रमप्राप्त असले तरी केवळ लहान फुटपाथ धारकांना त्यांच्या व्यवसायापासून वंचित करणे हा अन्याय आहे. नगर परिषदेने प्रस्तावित सर्वीस रोडच्या जागेतील बड्या भांडवलदारांचे अतिक्रमण हटवून मर्दुमकी दाखवावी पण ते केले जात नाही. महामार्ग प्राधिकरणाचे नियम धाब्यावर बसवून गांधी चौकातील सौंदर्यीकरण आणि अतिक्रमित जागेत नगर परिषदेने शुल्क घेवून बेकायदेशीरपणे जाहिरात फलक उभारण्याची परवानगी देवून दुजाभाव केला असल्याची टिकाही भाई रामदास जराते यांनी केली आहे.

अतिक्रमण हटविण्यात आलेले सत्तर टक्के फुटपाथधारक भाजपचे मतदार असले तरी ते स्थानिक भूमिपुत्र असून सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर त्यांच्या कुटूंबांचा रोजगार हिरावण्याचे काम थांबविण्यात यावे, अन्यथा फुटपाथ धारकांना तातडीने पर्यायी जागा आणि रोजगार मिळवून देण्यासाठी आमदार डाॅ. मिलिंद नरोटे यांच्या घरासमोर शेतकरी कामगार पक्ष बेमुदत ठिय्या आंदोलन करेल, असा इशारा जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जयश्रीताई वेळदा यांनी दिला आहे.

error: Content is protected !!