Home गडचिरोली कारवाफा आश्रमशाळेत करिअर मार्गदर्शन

कारवाफा आश्रमशाळेत करिअर मार्गदर्शन

212

अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे यांची संकल्पना ; आश्रमशाळा व वसतीगृहातील विद्यार्थ्यांसाठी शिबिराचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत बापूजी बहुजन समाज कल्याण बहुउद्देशीय संस्था नागपूरच्या वतीने गडचिरोली प्रकल्पातील कारवाफा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत सोमवार, १७ फेब्रुवारी रोजी इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळेत व वसतीगृहात शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभाग नागपूरचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे (भाप्रसे) सातत्याने प्रोत्साहित करीत आहेत. त्यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून नागपूर विभागात विविध उपक्रम राबविल्या जात आहेत. या उपक्रमांचाच हा एक भाग आहे.

करिअर मार्गदर्शन या स्तुत्य उपक्रमाद्वारे आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत येणाऱ्यांना नागपूर, वर्धा, देवरी, भंडारा, चंद्रपूर, चिमूर व गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी, भामरागड अशा एकूण ९ प्रकल्पातील शासकीय आश्रम शाळा व वसतीगृहातील विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे.

कारवाफा येथे प्रमुख मार्गदर्शक म्हणून वृषभ राऊत, सहयोगी मार्गदर्शक म्हणून हर्षल पाटील, प्रीतम गग्गुरी यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक विष्णू चव्हाण, माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे, वर्षा मस्के व इतर शिक्षक उपस्थित होते.

सदर करिअर मार्गदर्शन शिबिरामध्ये दहावी व बारावीनंतर असलेल्या अभ्यासक्रमाबाबत माहिती देण्यात आली. आईएएस, आईपीएस, आईएफएस, यूपीएससी, एमपीएससी,नीट ,जेईई, पॅरामेडिकल कोर्स, स्पर्धा परीक्षा, दहावी व बारावीनंतरचे शिक्षण क्षेत्र, रोजगार व व्यवसायिक शिक्षणासंबंधीची माहिती देण्यात आली. कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतून शिक्षण घेतल्यानंतर कोणकोणत्या नोकरीच्या संधी आहेत याची माहिती सुद्धा देण्यात आली. दहावी व बारावीनंतरच्या शिक्षणानंतर करिअर करण्याच्या सर्व पर्यायाविषयी विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली. विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन सुद्धा करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली.

error: Content is protected !!