Home गडचिरोली आदिवासी विकास सचिव विजय वाघमारे यांची चिमुकल्यांशी हितगुज

आदिवासी विकास सचिव विजय वाघमारे यांची चिमुकल्यांशी हितगुज

641

– कोलीतमारा आश्रम शाळेत मुक्काम

– प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या सहवासात अनुभवल्या आश्रमशाळांच्या समस्या

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे (भाप्रसे) यांनी शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी नागपूर प्रकल्पातील कोलीतमारा शासकीय माध्यमिक आश्रमशाळेला भेट दिली. रात्री मुक्कामी राहून सोयी सुविधांची पाहणी केली. आश्रमशाळेत शिकणाऱ्या चिमुकल्यांशी हितगुज केली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी व गावकरी यांच्याशी संवाद साधून मनमोकळीक व दिलखुलासपणे चर्चा केली. विद्यार्थ्यांसोबत राहून प्रत्यक्षात समस्या जाणून घेतल्या व अनुभवल्या. समस्यांवर उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

महाराष्ट्र राज्यात १९७२-७३ पासून आश्रमशाळा सुरू झाल्या. आदिवासी विकास विभागात पहिल्यांदाच मंत्र्यांसह अधिकाऱ्यांचा आश्रमशाळेत मुक्कामाचा असा संकल्प करण्यात आला. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी या संकल्पाची घोषणा केल्यानंतर ७ फेब्रुवारीला राज्यातील ४९७ शासकीय आश्रमशाळेत मुक्कामाच्या भेटीचे नियोजन करण्यात आले.

आदिवासी विकास मंत्री, राज्यमंत्री, आमदार, अधिकारी यांनी राज्यातील प्रत्येक शासकीय आश्रमशाळेला भेट देऊन मुक्काम केले. सचिव विजय वाघमारे यांनी सुद्धा कोलीतमारा आश्रमशाळेत मुक्कामी राहून आश्रमशाळा व वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या दिनचर्येचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. आदिवासी विद्यार्थ्यांसोबत जेवण केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व भावी जीवनातील मोठे ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून शुभेच्छा दिल्या. एकूणच या दौऱ्यामुळे सचिव विजय वाघमारे यांची ही मुक्कामी भेट कोलीतमारा शासकीय आश्रमशाळेसाठी अविस्मरणीय ठरली.

error: Content is protected !!