– आश्रमशाळा संघटनेचे मागण्यांचे निवेदन सादर ; नागपूर भेटीत शंभरांवर शिक्षकांची उपस्थिती
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आदिवासी विकास विभाग नागपूरचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांना शुक्रवार, २७ डिसेंबर रोजी नागपूर येथे सीटू संलग्नित आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रा. बी. टी. भामरे यांच्या नेतृत्वात संघटनेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आश्रमशाळेत उद्भवलेल्या अनेक समस्यांबाबत निवेदन सादर केले. यावेळी शिक्षकांसोबत झालेल्या सभेत आश्रमशाळेतील समस्या कर्मचाऱ्यांकडून जाणून घेतल्या व त्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन देताना अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
मला माझ्या कर्तव्याची जाणीव आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसह सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी कार्यतत्पर राहून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शिष्टमंडळात गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळा शिक्षकांसह नागपूर विभागातील शंभरावर शिक्षक उपस्थित होते.
भेटीच्या वेळेस व्यासपीठावर अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्यासह संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रा. बी. टी. भामरे, उपआयुक्त डिगांबर चव्हाण, संघटनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास खवशी उपस्थित होते.

यावेळी सादर केलेले निवेदनातील मागण्यांमध्ये आश्रमशाळा भेटीच्या वेळेस अधिकाऱ्यांकडून शिक्षक व कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळावी, आश्रमशाळेत सुरू असलेल्या अनेक उपक्रमांचा व्यवस्थित नियोजन करणे, वर्धा व चिमूर प्रकल्पातील शिक्षक तसेच तपासणी अधिकारी यांना दिलेले कारणे दाखवा नोटीस मागे घेणे, आश्रमशाळेत भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे, शिक्षक संवर्गातील प्रतिनियुक्त्या रद्द करणे, प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी अंतर्गत पदोन्नतीची वेतनश्रेणी अनुक्रमे ग्रेड वेतन ४३०० व ४८०० लागू करणे, प्रतीक्षा यादीतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे, इयत्ता अकरावी कला व विज्ञान शाखेच्या नवीन तुकडींना मान्यता देणे, गडचिरोली प्रकल्पातील १६० पैकी उर्वरित ६१ वर्ग ४ रोजंदारी कर्मचाऱ्यांना देखील पूर्ववत कामावर घेणे, प्रत्येक आश्रमशाळेत लीपिक पद भरणे आदी प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
या शिष्टमंडळात संघटनेच्या राज्य सचिव करुणा लांजेवार, गडचिरोली जिल्हाध्यक्ष राधेश्याम पत्रे, गडचिरोली प्रकल्प अध्यक्ष देव बन्सोड, दत्तात्रय सूर्यवंशी, सुरेखा तेलतुंबडे, प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे, के. व्ही. कुंडगीर, विवेक विरुटकर, सी. जी. भिवगडे, विकास जनबंधू, रामदास शहारे, तुकाराम सोनकुसरे, पुरुषोत्तम डोंगरवार, सुनील कापगते, संतोष धोटे, पी. आर. शंभरकर, एन. जी. कांबळे, प्रदीप लोहकरे, पी. एम. चिमूरकर, बी. एल. लंजे, गुलाब हर्षे, डी. सी. शिंपी, एन.यु. मोहतुरे आदींसह शिक्षक उपस्थित होते.







