विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कारवाफा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक सुधीर शेंडे होते. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व मालार्पण करुन श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना सुधीर शेंडे म्हणाले, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून खऱ्या मानवतावादी धर्माचा स्वीकार करून त्यांनी दाखविलेल्या मार्गाचा अवलंब सर्वांनी करावा. प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग विषमतावादी समाज व्यवस्था नष्ट करण्यासाठी व मानव कल्याणासाठी व्हायला पाहिजे.भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी डॉ.बाबासाहेबांचे विचार अंगीकृत करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अकरावीची विद्यार्थीनी समीक्षा उसेंडी हिने आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उच्च माध्यमिक शिक्षक एम. ई. ठाकूर, माध्यमिक शिक्षिका वर्षा मस्के, प्राथमिक शिक्षक रविकांत पिपरे, कविता बारसागडे, अभय कांबळे, करिष्मा गोवर्धन, सुनिता दुर्कीवार, संगीता करंगामी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन उच्च माध्यमिक शिक्षिका पद्मावती महेशगौरी यांनी केले.







