इंग्रजी आश्रमशाळेचे ७ विद्यार्थी राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत

37

– नांदेड येथे आयोजन : विभागीय स्पर्धेत दाखविली चमक

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीड़ा अधिकारी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत श्री गुरु गोबिंद सिंह स्टेडियम नांदेड येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेत स्थानिक शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेतील ७ खेळाडूंची निवड झालेली आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत स्थानिक शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेचे १७ खेळाडू चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे आयोजित विभागीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेत २९ सप्टेंबर ते १ आक्टोबर या कालावधीत सहभागी झाले होते. या स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शनाची छाप पडणाऱ्या ७ खेळाडूंची निवड राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे.

निवड झालेल्या खेळाडूंमध्ये कंपाउंड राऊंड वयोगट १४ वर्षे मुले निकेश हलामी (चतुर्थ), रिकर्व राऊंड वयोगट १४ वर्षे मुली प्रितिलता पुजेरी (प्रथम), इंडियन राऊंड वयोगट १४ वर्षे मुली सिमरन भोयर (तृतीय), मुस्कान कोला (चतुर्थ), इंडियन राऊंड वयोगट १९ वर्ष मुले रुद्र जुमनाके (तृतीय), इंडियन राऊंड वयोगट १९ वर्षे मुली ईशा मलिया (चतुर्थ), रिकर्व राऊंड १९ वर्षे मुले पियूष गावडे (चतुर्थ) यांचा समावेश आहे. विभागीय स्तरावर चमकलेल्या या खेळाडूंचे कौतुक होत आहे.

सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहुलकुमार मीना, सहाय्यक प्रकल्प अधिकारी वहीद शेख, अनिल सोमनकर, डॉ. प्रभू सादमवार, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका वंदना महल्ले, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, क्रीडा अधिकारी घनश्याम वरारकर, श्रीराज बदोले, नाजुक उईके, पायलेट प्रोजेक्ट आर्चरी प्रशिक्षण केंद्राचे धनुर्विद्या मार्गदर्शक रोशन सोळंके, हिमालय शेरखी, प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे, आश्रमशाळा व प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहे.