– काळी फीत लावून केली शाळेची वेळ बदलण्याची मागणी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आदिवासी विकास विभागातील राज्यभरातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी ५ सप्टेंबरच्या शिक्षक दिनावर शाळेची वेळ पूर्वीप्रमाणे ११ ते ५ करण्याच्या मागणीसाठी काळ्या फिती लावून बहिष्कार टाकला. या बहिष्कारला आश्रमशाळा कर्मचाऱ्यांकडून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.
सध्या आश्रमशाळेची वेळ सकाळी ८.४५ ते सायंकाळी ४ अशी असल्याने विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सदर वेळ अत्यंत अडचणीची व गैरसोयीची आहे. आदिवासी विकास विभागाने अत्यंत आडमुठेपणाचे धोरण अवलंबून सदरची वेळ कर्मचाऱ्यांच्या व विद्यार्थ्यांच्या माथी मारलेली आहे. शाळेची वेळ पूर्वीप्रमाणे ११ ते ५ अशी करण्यात यावी यासाठी सीटू संघटनेच्या वतीने त्यापूर्वी वेळोवेळी सनदशीर मार्गाने शासनास व प्रशासनास लेखी निवेदन, प्रत्यक्ष भेटीद्वारे अवगत केले. या व इतर मागण्यांसाठी आझाद मैदान मुंबई येथे २३ ऑगस्ट २०२३ व २२ जुलै २०२४ रोजी दहा हजार पेक्षा जास्त शिक्षकांनी राज्यभरातून सहभागी होऊन दोनदा भरपावसात धरणे आंदोलन केले होते हे येथे उल्लेखनीय आहे.
आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन नाशिक आयुक्तालय अंतर्गत नाशिक, ठाणे, अमरावती व नागपूर हे चार विभाग आहेत. राज्यात शासकीय ५९६ तर अनुदानित ५५६ असे एकूण ११५२ आश्रमशाळा आहेत. यामध्ये अपर आयुक्त, आदिवासी विकास नागपूर विभाग अंतर्गत ७६ शासकीय तर १३२ अनुदानित आश्रमशाळा आहेत. राज्यभरात हे बहिष्काराचे आंदोलन यशस्वी झाले.
शासनाने आश्रमशाळेची शालेय वेळ ११ ते ५ करण्याच्या मागणीची गंभीरतेने दखल न घेतल्याने ५ सप्टेंबरच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर आदिवासी विकास विभागातील राज्यभरातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून बहिष्कार टाकण्याचे आवाहन आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, राज्य सरचिटणीस प्रा. बी. टी. भामरे तसेच नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास खवशी, राज्य व विभागीय कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते.







