Home गडचिरोली आदिवासी विद्यार्थ्यांनी मोठे ध्येय गाठावे : आमदार डॉ. होळी

आदिवासी विद्यार्थ्यांनी मोठे ध्येय गाठावे : आमदार डॉ. होळी

132

– गडचिरोली प्रकल्पाच्या पुढाकाराने आदिवासी दिन साजरा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून संबंधित घटकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. आदिवासी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे. आदिवासी समाजाचे गोंडी भाषा, कला, कौशल्य यासह सांस्कृतिक विकास होणे आवश्यक आहे. आजच्या दिनाचे औचित्य साधून आदिवासी विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये मोठे ध्येय गाठण्याचा संकल्प करावा. नियमित अभ्यास करून आपला शैक्षणिक विकास साधावा असे आवाहन गडचिरोली विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले.

आदिवासी विकास विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या वतीने जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमाचे आयोजन येथील सेमाना बायपास मार्गावरील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत शुक्रवार, ९ ऑगस्ट रोजी करण्यात आले, याप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहुलकुमार मीना होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीचे सचिव न्यायाधीश आर‌. आर. पाटील, शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ गडचिरोलीचे शाखा व्यवस्थापक हर्षल बोरोले, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष उर्मिला सिडाम, गुप्तनाथ मेश्राम, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल सोमनकर, डॉ. प्रभू सादमवार आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी आपल्या भाषणात न्यायाधीश आर. आर. पाटील यांनी अनेक कायद्यासह आदिवासी समाजावर होणाऱ्या अत्याचारा संबंधीचे कायदे, पेसा कायदा, पोक्सो कायदा, २००६ चा वन अधिकार अधिनियम,ग्रामसभेचे अधिकार याविषयी जाणीव करून दिली. आदिवासी समाजाने उन्नतीसाठी शैक्षणिक मार्गाचा अवलंब करून चुकीच्या चालीरीती, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा यापासून आदिवासी समाजाने दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शासकीय आश्रम शाळेत सुरू असलेल्या ब्राईटर माईंड उपक्रमातील शासकीय आश्रमशाळा कुरंडीमाल येथील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी रोशनी मडावी, शासकीय आश्रमशाळा सोडे येथील इयत्ता सहावीची आकांक्षा कोवे व राशी पोटावी यांनी डोळ्याला पट्टी बांधून वस्तूंचे रंग ओळखले व बिनचूक वाचन करून उपस्थित सर्वांना चकितच केले.

यावेळी प्रकल्पातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील, एकलव्य व सैनिकी शाळेतील इयत्ता १० व १२ वीच्या ५२ गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच संबंधित नवनियुक्त आदिवासी पोलीस शिपायांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा गडचिरोली येथील विद्यार्थिनींनी आदिवासी नृत्यातून आपले कलागुण सादर केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहुलकुमार मीना यांनी केले. संचालन कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संतोष कन्नाके यांनी केले. सहाय्यक प्रकल्प अधिकारी वहीद शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक संशोधन अधिकारी गजानन बादलमवार, लेखाधिकारी दादाजी सोनकर, सुधाकर गौरकर, कार्यालय अधीक्षक वासुदेव उसेंडी, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मुकेश गेडाम, मुख्याध्यापिका वंदना महल्ले, प्रसिद्ध प्रमुख सुधीर शेंडे, ओम राठोड, गणेश पराते, कार्तिकस्वामी कोवे, श्रीकांत पाल, सुभाष लांडे, प्रतिभा बनाईत, शुभांगी कोहळे, प्रीती कोंतमवार, विशाल नन्नावरे, प्रकाश अक्यमवार, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!