विजयनगर येथील बंगाली बांधवांच्या जमिनीवरील अतिक्रमणाची कारवाई तत्काळ थांबवावी : आमदार डॉ. देवरावजी होळी

105

– शेतजमिनीचे अतिक्रमण हटविल्यास हजारो बंगाली बांधवांच्या परिवारावर उपासमारीची पाळी येणार

– बंगाली बांधवांचे शेतजमिनीचे अतिक्रमण हटविणे हे अमानवीय कृत्य असल्याचा गंभीर आरोप

– अन्यायाचा विरोध करताना अनुचित काही घडल्यास महाविकास आघाडीचे सरकार जबाबदार

– बंगाली बांधवांनी शांतता पाळावी, लोकशाही व शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे

– अन्यायकारी, अत्याचारी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात प्रत्येक बंगाली गावात आंदोलन करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मागील २५ वर्षांहून अधिक कालावधीपासून शेतजमीन करणाऱ्या बंगाली बांधवांची शेती वनविभागाच्या माध्यमातून अतिक्रमण म्हणून काढण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून होत असून मागील शेती कसणाऱ्या बंगाली बांधवांचे अतिक्रमण हटविणे मानवी हक्कांचे उल्लंघन असून अमानवीय कृत्य असल्याचा गंभीर आरोप करीत विजयनगर तालुका मुलचेरा येथील बंगाली बांधवांच्या जमिनीवरील अतिक्रमणाची कारवाई तत्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी शासनाला केली आहे.

राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने मागील २ वर्षांपासून ऊठसूट बंगाली बांधवांचे अतिक्रमण काढण्याचा सपाटा सुरू केला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर अतिक्रमण थांबविण्यात यावे, असे निर्देश वन अधिकाऱ्यांना दिलेले असताना सुद्धा स्थानिक उपवनसंरक्षक व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बंगाली बांधवांना नाहक त्रास देण्यासाठी अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सरकारने बंगाली बांधवांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. बंगाली बांधवांकडून काही अनुचित प्रकार झाल्यास त्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार राहील, असे प्रतिपादन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केले आहे. अन्यायकारी, अत्याचारी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात प्रत्येक बंगाली गावात आंदोलन करण्याची आवश्यकता असून बंगाली बांधवांनी लोकशाही व शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.