सुरजागडसह गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण 25 लोहखदानी रद्द करण्याच्या मागणीसाठी शेकापचे विधान भवनासमोर आंदोलन

129

– मुबंई पोलिसांनी विधानभवन परिसरातून शेकापचे भाई रामदास जराते यांना केली अटक

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात येथे बळजबरी पोलीस बळाचा वापर करून विकासाच्या नावावर जंगलाची तोड करून लोहखदान सुरू करण्यात आलेली आहे. कोरची तालुक्यातील झेंडपारसह विविध ठिकाणी लोहखाणी प्रस्तावित करण्यात आलेल्या असून ग्रामसभांना मिळालेले संविधानिक हक्क व अधिकारावर गदा आणली असून सरकार लाखो एकर जमिनीवरील जंगल नष्ट करीत आहे. आपल्या प्रथा, परंपरा रीतिरिवाज आणि जगण्याची संसाधने व आपले अस्तित्व टिकविण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील माडिया समाज संघर्ष करीत आहे. मात्र भांडवल दाराच्या हितासाठी केंद्र व राज्य सरकार या संघर्षाकडे दुर्लक्ष करीत असल्याने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, भाई देवेंद्र चिमनकर यांच्या नेतृत्वात 7 मार्चला विधान भवनाच्या दारावर लक्षवेधी निदर्शने करण्यात आली. या निर्दशनादरम्यान मुबंई पोलिसांनी आंदोलनकर्त्यांंचे नेतृत्व करणारे शेतकरी कामगार पक्षाचे भाई रामदास जराते, देवेंद्र चिमनकर व इतर आंदोलनकर्त्यांंना अटक केली.

संविधानाची पाचवी अनुसूची पेसा व वनाधिकार कायद्याने जल जंगल व जमीन व संसाधनाची मालकी ग्रामसभेला प्राप्त करून दिली असताना व जंगलावर आधारीत आर्थिक विकासाच्या संधी निर्माण झालेल्या असताना भांडवल दाराच्या हितासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड, बांडे, गुंडजूर, मोहंदी, दम कोंडवाही आगरी, मसेली, झेंडपार या 25 लोहखाणी प्रस्तावित आहे. यामध्ये 45 हजार एकर जंगलाची तोड होणार आहे. यामुळे पिढ्यानपिढ्या जंगलावर उपजीविका करणाऱ्या आदिवासी बांधवावर सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या विस्थापित होण्याची वेळ आली आहे. यामुळे जंगलातील अती असुरक्षित जमातींपैकी एक असलेल्या माडिया जमातीचे मानवी अस्तित्व संपण्याचा धोका निर्माण झाला आहे.