शिष्यांनी केलेल्या गौरवामुळे गुरूवर्य भारावले

92

– मराठी भाषा दिनानिमित्त सेवानिवृत्त प्रा. अरविंद बंदे यांचा सत्कार

– शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंद कात्रटवार यांनी घडवून आणला सत्कार सोहळा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : ‘माझा मराठीचा बोलू कौतूके, परी अमृतातेही पैजा जिके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन’ या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी मराठीची महत्ती विषद केली आहे. मराठी भाषेचे गुणगाण करावे तेवढेच कमी आहे. शब्द सुध्दा अपुरे पडतील अशी मायमराठी आपली राज्यभाषा आहे. मराठीच्या महत्तीत अनेक संत, कवी साहित्यीकांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. 27 फेब्रुवारी राज्यभर मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून मराठी वाड्मयाचे गाढे अभ्यासक तथा शिवाजी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक अरविंद बंदे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन माजी विद्यार्थ्यांनी त्यांचा गौरव केला. माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या सत्कारामुळे प्रा. अरविंद बंदे भारावून गेले. मराठी भाषादिनी माझा केला सत्कार हा माझ्या कार्याला प्रेरणा देणारा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठी साहित्य. कला, वाड्मय क्षेत्रात महत्वपुर्ण योगदान देणाऱ्या विभूतींचा गौरव करण्याचे निर्देश राज्याचे मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना दिले. यानुसार शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या पुढाकाराने त्यांचे गुरूवर्य तथा शिवाजी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. अरविंद बंदे यांच्या सत्काराचा योग मराठी भाषा गौरव दिनी जुळून आला. कात्रटवार यांनी आपल्या शिवसैनिकांसह प्रा. अरविंद बंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी शिवाजी महाविद्यालयात प्रा. बंदे यांच्या मार्गदर्शनात ज्ञानाचे धडे घेणारे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा शिवसेना नेते विलास कोडापे, माजी नगरसेवक रमेश चौधरी, पत्रकार अनिल बोदलकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करतांना शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंद कात्रटवार व सह संपर्क प्रमुख विलास कोडापे यांनी शिवाजी महाविद्याललयात शिक्षण घेत असताना मराठी वाड्मयाचे प्रा. अरविंद बंदे यांच्या शैक्षणिक कार्याला उजाडा दिला. मराठी भाषा गौरवदिनी त्यांच्या सत्काराचा योग येणे हे आमचे भाग्य असल्याचे सांगून प्रा. अरविंद बंदे यांना दिर्घायुष्य लाभो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना प्रा. अरविंद बंदे म्हणाले, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे मराठी भाषेची महत्ती फार मोठी आहे. मराठीच्या भूमीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम पासून अनेक थोर संतांनी जन्म घेतला. त्यांनी मराठीची थोरवी अभांगातून मांडली. मराठी ही केवळ राज्यभाषा नसून एक अमुल्य ठेवा आहे. तो जपून ठेवण्याची गरज आहे. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे आज मराठीला मोठा मान- सन्मान प्राप्त झाला आहे. मराठीला समृध्द करण्यासाठी प्रत्येकांनी योगदान देण्याची गरज आहे. असे प्रा.मा.अरविंद बंदे म्हणाले. या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार, सह संपर्क विलास कोडापे, नगरसेवक रमेश चौधरी, यादवजी लोहबरे, बोदलकर, संदीप भुरसे, संदीप अलबनकर, संजय बोबाटे, सूरज उइके, हरबाजी दाजगये, स्वप्निल ढोढरे, निकेश लोहबरे, राहुल सोरते, स्वप्निल खांडरे आदी उपस्थित होते.