आलापल्ली – सिरोंचा महामार्ग प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

89

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मागील काही महिन्यांंपासून गाजत असलेल्या आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे प्रकरण न्यायालयात पोहचले आहे.  या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरूस्तीच्या कामात कोट्यवधीचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप समाजकल्याण, अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी केला होता. शासन, प्रशासनाने या कामाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी केली होती. परंतु याबाबत कोणतीही चौकशी करण्यात न आल्याने ताटीकोंडावार यांनी न्यायालयात धाव घेतली असून आलापल्ली- सिरोंचा महामार्गाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

याबाबाबत संतोष ताटीकोंडावार यांनी १९ जानेवारी रोजी स्थानिक विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन प्रकरणाबाबत पत्रकारांना माहिती दिली. ताटीकोंडावार यांनी सांगितले की, आलापल्ली – सिरोंचा महामार्गाच्या दुरूस्तीच्या कामाबाबत प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी, आंदोलने करून सुध्दा प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. सदर रस्त्याचे काम योग्यरित्या झाले नसून शासनाच्या पैशाचा अयोग्य पध्दतीने वापर करण्यात आला आहे. सन २०१७ पासून २०२१ पर्यंत या रस्त्याच्या दुरूस्तीवर १०० कोटी पेक्षा अधिक खर्च करण्यात आला. परंतु रस्त्याची दैनावस्था अद्यापही दूर झालेली नाही. केवळ कंत्राटदाराचे खिसे भरण्याचे काम करण्यात आल्याचा आरोप ताटीकोंडावार यांनी केला.

शासनाच्या पैशाचा दुरूपयोग होऊन सुध्दा यास जबाबदार असलेल्यांवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे ऍड. अनिल ढवस यांच्यामार्फत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली, अशी माहिती संतोष ताटीकोंडावार यांनी पत्रकार परिषेदतून दिली. पत्रकार परिषदेला समाजकल्याण, अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीचे संघटक अरूण शेडमाके उपस्थित होते.