– निवेदनातून तहसीलदारांकडे वंचित बहुजन आघाडीची मागणी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील सावंगी येथील भूमिहीन शेतमजूर माधव दिघोरे यांच्या नावाने खसरा नंबर असलेल्या वन जमिनीवर गावातील एका व्यक्तीने धाकदपट करून कब्जा केल्याप्रकरणी चौकशी करून न्याय देण्यांची मागणी वंचित बहुजन आघाडीने तहसीलदार संतोष माहाले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, माधव मोतीराम दिघोरे यांनी वनजमिनीवर अतिक्रमण केले होते. त्यामुळे २००६ मध्ये त्या जमिनीच्या खस-यावर त्याचे नाव चढविण्यात आले. परंतु गावातील एका व्यक्तीने त्याची जमिन बळकावून त्याला धाकदपट करून मारपीट करण्याची वारंंवार धमकी देत आहे व जमिनीवर कब्जा करून उत्पादन घेत आहे. ही बाब संबंधित विभागाच्या लक्षात आणून दिली असता तहसीलदार देसाईगंज यांनी जमिनीची मोजणी करण्याचे आदेश भूमिअभिलेख कार्यालयाला दिले. परंतु भूमिअभिलेख कार्यालयाने कोणतीही कारवाई न करता गावात जाऊन परत आले. सदर प्रकरणाची माहिती पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना देण्यात आली असता त्यांनी संबंधित पत्र वनमंत्रालयाकडे दिले व वनमंत्रालयानेे संबंधित प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. परंतु त्या पत्राला सुद्धा प्रशासकीय अधिका-यांनी केराची टोपली दाखवली आहे. म्हणून सदर प्रकरणाची तत्काळ चौकशी करून भूमिहीन शेतमजूर माधव दिघोरेला न्याय द्यावा, अन्यथा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिवशी आंदोलन करण्याचा ईशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.
निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते बाळू टेंभुर्णे, माजी तालुकाध्यक्ष एन. आर. रामटेके, जिल्हा संघटक जगन बंसोड, तालुध्यक्ष दुष्यांत वाटगुरे, जेष्ठ कार्यकर्ते उध्दवराव खोब्रागडे, युवक आघाडीचे मिलींद अंबादे, शहराध्यक्ष आमटे, युवक आघाडीचे राहूल बोरकर, भूमिहीन शेतमजूर माधव दिघोरे आदी उपस्थित होते.