चित्रपट केवळ करमणुकीचे साधन नाही तर समाजप्रबोधनाचे माध्यम : अजय गंपावार

131

– कुरखेडा येथील मुनघाटे महाविद्यालयात चित्रपट महोत्सवाचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मोकळेपणाने बोलण्याचे कार्य चित्रपटच्या माध्यमातून होत असते. चित्रपट केवळ करमणुकीचे साधन नाही तर समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन अजय गंपावार यांनी केले. मावा संस्था व आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कुरखेडा येथील गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयात ‘समभाव’ या विषयावर दोन दिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे आभासी पद्धतीने उद्घाटन गंपावार यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दंडकारण्य शिक्षण संस्थांचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे, मावा संस्थेचे सहसंस्थापक हरिश सदानी,आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे संस्थापक डॉ. सतीश गोगुलवार, जि. प. सदस्य ॶॅड. लालसु नोगोटी, वंदना मुनघाटे, आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेच्या शुभदा देशमुख आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉ. प्रमोद मुनघाटे म्हणाले की, हजारो पुस्तके वाचून जे कळू शकत नाही ते चित्रपटातून सहजपणे कळते. त्यामुळे चित्रपटाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. या चित्रपट महोत्सवात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले चित्रपट दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. गणेश सातपुते यांनी केले.