मुनघाटे महाविद्यालयात दिवाळी अंकांचे प्रदर्शन

156
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : श्री. गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय कुरखेडा येथे दिवाळी अंक 2021 च्या प्रदर्शनीचे उद्घाटन नागपूर विभागाचे उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. संतोष ठाकरे यांच्या उपस्थित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. सुरेश रेवतकर, प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे, प्राचार्य डॉ. बाकरे, प्राचार्य डॉ. सुभाष,  प्राचार्य डॉ. चंद्रमौली, डॉ. संजय सिंग, डॉ. मंडल आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. संतोष ठाकरे यांनी सदर दिवाळी अंक हे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे खाद्यान्न असल्याचे मत व्यक्त करीत महाराष्ट्रातील विविध प्रकाशकांनी उपलब्ध केलेल्या दिवाळी अंकांंची प्रदर्शनी महाविद्यालयात आयोजित केल्याबद्दल व विविध विषयांचे अंक प्रदर्शित ठेवल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांचे अभिनंदन केले. सदर दिवाळी अंक हे विद्यार्थ्यांनी वाचन करून आपल्या ज्ञानात भर घालावी, असे प्रतिपादन करीत आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी सदर अंक हे पर्वणीच असल्याचे मत व्यक्त केले. कुरखेडा सारख्या दुर्गम भागात महाविद्यालयाचे समृद्ध ग्रंथालय बघून आपण भारावून गेलो असल्याचे मत सहसंचालक डॉ. संतोष ठाकरे यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी महाविद्यालयात दरवर्षी अशा प्रकारचे दिवाळी अंक प्रदर्शन आयोजित करून विद्यार्थ्यांच्या लेखन आणि वाचन कल्पकतेला वाढ होत असल्याचे मत व्यक्त करीत महाविद्यालयाच्या मृदुगंध
वार्षिक अंकात याचे प्रतिबिंब दिसत असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. अनिल भोयर तर आभार राजेंद्र काचीनवार यांनी मानले.