सिकलसेल रुग्णांनी सकारात्मक दृष्टिकोनाने जगावे : डॉ. शारदा कुमरे

95

– पोटेगाव आश्रमशाळेत जनजागृती कार्यक्रम

गडचिरोली : सिकलसेल हा अनुवंशिक आजार आहे. या रोगाचा वाहक अथवा रुग्णांचे लग्न निरोगी, वाहक अथवा रुग्णसोबत झाल्यास त्यांचे काही अथवा सर्व अपत्ये वाहक किंवा रुग्ण होऊ शकतात. त्यामुळे विवाह करताना रक्त तपासून काळजीपूर्वक निर्णय घ्यावा. तसेच या रोगाच्या रुग्णाने वैैद्यकिय सल्ला व उपचार घेऊन न घाबरता आपले जीवन सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगावे, असे मोलाचे मार्गदर्शन प्राथमिक आरोग्य केंद्र पोटेगाव येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. शारदा कुमरे यांनी केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पोटेगाव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आयोजित सिकलसेल, अनीमिया व आरोग्य पोषण जनजागृती कार्यक्रमात त्या विशेष अतिथी म्हणून बोलत होत्या. डॉ. कुमरे पुढे म्हणाल्या, सिकलसेल रुग्णांनी प्रथिनेयुक्त समतोल आहार घ्यावे. आवश्यक तेवढे पाणी प्यावे.जास्त परिश्रम व चिंता करू नये. फॉलीक अँसिड गोळ्या नियमित घेऊन लाल रक्त पेशींची निर्मिती वाढवावी. त्याचबरोबर सिकलसेल आजाराबद्दल समाजात असेलले गैरसमज दूर करून रुग्णांना चांगली व माणुसकीची वागणूक द्यावी. तसेच अनीमिया टाळण्यासाठी आहारात सुधारणा करावी. भारतीय तिरांगाच्या रंगाप्रमाणे हिरव्या, पांढऱ्या व केसरी रंगाची फळे, भाज्या व पदार्थांचा समावेश करून संतुलित आहार घ्यावे. आहारातील अन्नपदार्थात कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे या पोषक घटकांचा समावेश असावा, असा सल्लाही त्यांनी दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मंगेश ब्राह्मणकर होते. प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे, माध्यमिक शिक्षिका प्रमिला दहागावकर,जेष्ठ प्राथमिक शिक्षक व्ही. एस. कापसे, अधीक्षिका एल.आर.शंभरकर उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक ब्राह्मणकर व सुधीर शेंडे यांनीही अरोग्यासंबंधी उपयुक्त मार्गदर्शन केेले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सुधीर शेंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मचारी व विद्यार्थांनी सहकार्य केले.