जुनी पेन्शनसाठी हजारो कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

51

– मोर्चात विविध कर्मचारी संघटनांचा सहभाग

– जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, महानगर पालिका, नगर परिषदा, नगर पंचायती कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी व इतर प्रलंबित मागण्यांची पुर्तता करण्यात यावी यासाठी सरकारी- निमसरकारी कर्मचारी, शिक्षक- शिक्षकेत्तर संघटना समन्वय समिती जिल्हा गडचिरोलीच्या मार्फतीने १६ मार्च रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला.


जुनी पेन्शन लागू करण्यात यावी व इतर प्रलंबित मागण्यांची पुर्तता करण्यात यावी याकरिता कर्मचाऱ्यांनी
१४ मार्चपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. या संपात गडचिरोली जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटना सहभागी झाल्या आहेत. दरम्यान, १६ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला.


या मोर्चाची सुरुवात धानोरा मार्गावरील तहसील कार्यालय परिसरातून करून इंदिरा गांधी चौक मार्गे काॅम्पलेक्सकडे मार्गक्रमण करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील खुल्या जागेत मोर्चेकरी कर्मचारी एकत्रित झाले. यावेळी विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांना प्रलंबित मागण्यांसंदर्भात संबोधित केले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या भव्य आक्रोश मोर्चात सरकारी- निमसरकारी कर्मचारी, शिक्षक- शिक्षकेत्तर संघटना समन्वय समिती, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, राज्य कर्मचारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, इतर विविध कर्मचारी संघटना व हजारो कर्मचारी सहभागी झाले होते.