धान रोवण्याची कामे रोजगार हमी योजनेतून करा : शेतकरी कामगार पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

672

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : पूर आणि अतिवृष्टीग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धान रोवणी व रोवणी पश्चात कामांना शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात येवून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

निवेदनात शेतकरी कामगार पक्षाने म्हटले आहे की, जिल्ह्यात पाऊस आणि पुरामुळे थैमान घातले आहे. यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे पऱ्हे, आवते वाहून गेले. शेतकऱ्यांनी बँकांकडून घेतलेल्या पिक कर्जाची रक्कम यामध्ये गुंतविली होती. तसेच नव्याने पऱ्हे, आवते पेरण्याची वेळ निघून गेलेली असल्याने आर्थिक विवंचनेमुळे शेती पडीक राहण्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याची बाब लक्षात आणून दिली आहे.

जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती लक्षात घेता सरकारने सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि सानुग्रह मदत करणे क्रमप्राप्त आहे. मात्र सदर मदतीच्या बळावर नुकसान भरुन निघणे शक्य नसून ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची धान रोवणी व रोवणी पश्चात कामे शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात येवून खते, कीडनाशके – औषधे, औजारे आणि मजुरी यासाठीचा खर्च प्रती एकरीप्रमाणे मजगी आणि फळबाग योजनेच्या धर्तीवर खात्यात जमा करण्यात येवून धान उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा, अशीही मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जयश्रीताई वेळदा यांनी केली आहे.