नुकसानग्रस्त पिकांचे सर्व्हे करुन नुकसान भरपाईसाठी शासनाला अहवाल सादर करण्यात यावा : आमदार कृष्णा गजबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

90

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आरमोरी विधानसभा क्षेत्रा अंतग॔त येणाऱ्या तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त पिकांचे सर्व्हे करुन नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाला अहवाल सादर करण्याची मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मिना यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आरमोरी विधानसभा क्षेत्रा अंतग॔त येणा-या कुरखेडा, आरमोरी व देसाईगंज तालुक्यात माहे जानेवारी-२२ च्या दुस-या आठवड्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला.काही ठिकाणी हलक्या स्वरुपात गारपिट सुद्धा झाली तर मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असुन अजुनही अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अवकाळी पावसामुळे शेतक-यांनी रब्बी हंगामात लावलेल्या मका, चना, तुर, मुग, उडिद या कडधान्यासह मोठ्या प्रमाणात लावलेल्या मिरची व भाजीपाला पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. खरीप हंगाम झालेल्या तन रोगाच्या प्रादुर्भावामुळे एकुणच उत्पन्नात प्रचंड घट आली असुन अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील उपरोक्त पिकांनाही जबर फटका बसल्याने येथील शेतकरी अधिकच अडचणीत आले आहेत.
दरम्यान अवकाळी पावसामुळे झालेल्या पिक नुकसानीचे पंचनामे करणे अत्यावश्यक झाले असताना अद्यापही शासकीय स्तरावरुन कुठल्याच हालचाली दिसुन येत नसल्याने शेतक-यांतुन तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.शेतक-यांच्या संयमाचा बांध फुटून अनुचित घटना घडु नये यास्तव झालेल्या रब्बी पिकांच्या नुकसानीचे तत्काळ सर्व्हे करुन नुकसान भरपाईसाठी तसा अहवाल शासनास सादर करण्याची मागणी आमदार गजबे यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागून आहे.