शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिवेशन घ्यावे : आमदार डॉ. देवरावजी होळी यांची विधानसभेत मागणी

101

– शासनाचे जी.आर. व अध्यादेश केवळ कागदोपत्री घोडे असल्याची खंत

– ग्रामीण भागातील लोकांपर्यंत अनेक जीआर व अध्यादेश वर्षानुवर्षे पोहोचतच नसल्याने व्यक्त केली चिंता

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सरकार जनतेच्या कल्याणासाठी अनेक शासन निर्णय व अध्यादेश काढून जनतेचे काम सुलभ व्हावे यासाठी प्रयत्न करीत असते. परंतु शासन निर्णय काढलेल्या जीआर व अध्यादेशाची अंमलबजावणी अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे त्या शासन निर्णयाची योग्यप्रकारे अंमलबजावणी व्हावी याकरिता अधिवेशन घ्यावे, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्पाच्या चर्चेत सहभागी होऊन केली.
केंद्र शासनाने शंभराहून अधिक योजना काढून सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी निर्णय घेतले. परंतु त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करताना स्थानिक अधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये आडकाठी निर्माण करीत असतात. अनेक शासन निर्णय तर धूळखात पडलेले असून त्याची साधी माहिती सुद्धा सामान्य जनतेला नाही. ग्रामीण भागातील लोकांपर्यंत अनेक जीआर व अध्यादेश वर्षानुवर्षे पोहोचतच नाही. हे सर्व शासन निर्णय अध्यादेश म्हणजे केवळ कागदोपत्री घोडेच बनलेले आहेत. त्यामुळे अशा शासन निर्णयांची योग्यप्रकारे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्याकरिता शासनाने सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिवेशन घ्यावे अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी यांनी विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चेत भाग घेताना राज्य शासनाला केली.