– आमदार कृष्णाजी गजबे यांची वने व सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडे मागणी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : अतिदुर्गम,आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा, आरमोरी व देसाईगंज तालुके गडचिरोली वनवृत्तातील वडसा वन विभागाअंतग॔त येत असून जंगलव्याप्त आहेत. या भागात अलिकडे जंगली हत्तींचा मोठ्या प्रमाणात संचार वाढलेला असून चारही तालुक्यात जंगली हत्तींनी अतिक्रमणीत शेतजमिनीसह शेतपिकाचे प्रचंड नुकसान केले आहे. मात्र शासन निर्णयातील तरतुदीनुसार २५ हजाराच्या कमाल मर्यादेत नुकसान भरपाई देण्यात येत असल्याने याचा जबर फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे पाहू जाता यात वाढ करून देण्याची मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
दिलेल्या निवेदनात आमदार गजबेंनी म्हटले आहे की, आरमोरी विधानसभा क्षेत्रातील उपरोक्त चारही तालुके जंगलव्याप्त असून चारही तालुक्यातील वन परिक्षेत्रात जंगली हत्तींचा मोठ्या प्रमाणात संचार वाढलेला आहे. जंगलालगत असलेल्या शेतशिवारात जंगली हत्ती घुसून उभे पिक फस्त करीत आहेत. तसेच फळझाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत.
सदर परिसर उद्योगविरहीत असून येथील शेतकऱ्यांची उपजिवीका शेतीवर अवलंबून आहे. असे असताना संदर्भिय शासन निर्णयातील तरतुदीनुसार २५ हजारांच्या कमाल मर्यादेत नुकसान भरपाई देण्यात येत आहे जे की नुकसानीच्या प्रमाणात अतिशय कमी आहे. सदर नुकसान भरपाई ही ८ वर्ष पुर्वीच्या उत्पादन खर्चावर आधारित असुन सद्यास्थितीत उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली असल्याने झालेल्या नुकसानीच्या मानाने अत्यल्प नुकसान भरपाई देण्यात येत असल्याने येथील शेतकरी पुरते बरबादीच्या उंबरठ्यावर उभे आहेत.
दरम्यान, अनेक शेतकरी शेतजमिनीवर अतिक्रमण करून तसेच काबील कास्तकार प्रकारच्या जमिनीवर शेती करीत आहेत. मात्र संबंधित शेतकऱ्यांकडे सदर शेतजमिनीचा सातबारा उपलब्ध नसल्याने वन विभागाकडून झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देताना अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. यामुळे संबंधित शेतकरी जंगली हत्तींच्या उपद्रवामुळे पुरते रस्त्यावर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून आत्महत्येस प्रवृत्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही गंभीर बाब लक्षात घेता व उपरोक्त परिसरात जंगली हत्तींनी उभ्या शेतपिकाची व फळझाडांची नुकसान लक्षात घेता नुकसान भरपाईच्या रकमेत एक लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात यावी. तसेच नुकसानग्रस्त अतिक्रमणीत शेतकऱ्यांची संबंधित तलाठी कार्यालयात अतिक्रमण धारक शेतकरी म्हणून असलेल्या नोंदी ग्राह्य धरून त्यांना विशेष बाब म्हणून नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार गजबेंनी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.