जहाल महिला माओवादीने केले गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण

90
– शासनाने जाहीर केले होते 11 लाखांचे बक्षीस
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, ७ ऑक्टोबर : शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 586 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. नुकतेच 11 लाख रुपयांचे बक्षीस असलेली जहाल महिला माओवादी नामे रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी (वय 28 वर्ष) रा. ईरुपगुट्टा, पो. भोपालपट्टनम जि. बिजापूर (छ.ग.) हिने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासमोर आत्मसमर्पण केले.
आत्मसमर्पीत महिला माओवादी रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी ही ऑगस्ट 2009 ला फरसेगड दलममध्ये सदस्या पदावर भरती होऊन सन 2010 पर्यंत कार्यरत होती. सन 2010 ला ओरच्छा दलममध्ये बदली होऊन सन 2013 पर्यंत कार्यरत होती. सन 2013 ला नॅशनल पार्क एरीया डॉक्टर टीममध्ये बदली होऊन एसीएम (एरीया कमीटी मेंबर) पदावर पदोन्नती होऊन सन 2015 पर्यंत कार्यरत होती. सन 2015 ला सांड्रा दलममध्ये बदली होऊन आजपर्यंत कार्यरत होती.
तिचा सन 2015 मध्ये गुंडम जंगल परिसरातील चकमक, सन 2017 साली बेज्जी ते येर्रागुफा मार्गावरील अॅम्ब्युश/चकमकीमध्ये सहभाग असून यामध्ये डीआरजी (छ.ग.) चे 12 पोलीस जवान शहिद झाले होते. सन 2018 मध्ये मारेवाडा जंगल परिसरातील चकमक व सन 2019 मध्ये बोरामज्जी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये सहभाग होता.
तसेच सन 2020-21 मध्ये उपराल (छत्ती.) येथील एका निरपराध इसमाचा खून, सन 2018 मध्ये बेद्रे रोडवर सरकारी बसची जाळपोळ करण्यात तिचा सहभाग होता. दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी चळवळीकरिता व जनतेकरिता पैसे गोळा करण्यास सांगत असतात व तो पैसा ते स्वत:साठीच वापरतात. स्त्रीयांना भेदभावजनक वागणूक देतात. दलममध्ये असताना विवाह झाले तरीही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नसल्याने आपण पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे आत्मसमर्पित  महिला माओवादी रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी हिने म्हटले आहे.
रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी हिच्यावर महाराष्ट्र शासनाने 6 लाख रुपयांचे तर छत्तीसगड सरकारने 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहिर केले होते. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरिता केंद्र व राज्य शासनाकडून रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी हिला 4 लाख 50 हजार रुपये बक्षीस जाहिर केले आहे. गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2023 सालामध्ये आतापर्यंत एकुण 13 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­ऱ्या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल. त्यामुळे त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा, असे आवाहन गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.