गडचिरोली जिल्ह्याच्या प्रगतीत महसूल विभागाचा मोठा वाटा : जिल्हाधिकारी संजय मिना

55

– जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिन साजरा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २ ऑगस्ट : जिल्ह्यातील गावपातळीवरील महसूल कर्मचारी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हे जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे. माणसाच्या जन्मापासून तर मृत्युपर्यंतच्या नोंदी ठेवण्यासाठी उपयोगी पडणारा महसूल विभाग एक प्रमुख भाग आहे. म्हणूनच महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचा जिल्ह्याला प्रगतीपथावर आणण्यासाठी फार मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय मिना यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिन साजरा करण्यात आला, त्याप्रसंगी जिल्हाधिकारी मिना अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.

याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त  पोलीस अधिक्षक कुमार चिंता, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी श्री. कनसे, उपजिल्हाधिकारी प्रसेनजीत प्रधान, तहसीलदार मोहन टिकले, सुनिल सौदाने, नियोजन अधिकारी खडतकर, तहसिलदार संजय रामटेके हे प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मिना पुढे म्हणाले, आपले नित्याचे कामे करीत असताना सुध्दा महसूल कर्मचारी जिल्ह्यात उद्भवणाऱ्या आपत्तीप्रसंगी तसेच वेळोवेळी येणाऱ्या निवडणुकांचे काम मोठ्या उत्साहात पार पाडीत असतात. संपुर्ण राज्यात आजपासून महसूल सप्ताहाचा शुभारंभ झाला आहे. 2 ऑगस्टला युवासंवाद, 3 ऑगस्टला एक हात मदतीचा, 4 ऑगस्टला जनसंवाद महसूल अदालतचे आयेजन, 5 ऑगस्टला सैनिक हो तुमच्यासाठी, 6 ऑगस्टला महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्तांचा संवाद कार्यक्रम व 7 ऑगस्टला महसूल सप्ताहाचा समारोप होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी महसूल विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांचा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. यामध्ये नायब तहसीलदार डी. एस. ठाकरे, सेवानिवृत्त तहसिलदार संजय रामटेके, मंडळ अधिकारी आर. एस. गोरेवार, अव्वल कारकून ममता शेंडे, स्विय सहाय्यक प्रविण गुज्जनवार, नायब तहसीलदार अमोल गवारे, सी. एच. चिमलवार यांना सन्मानित  करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी संजय मिना यांच्या हस्ते नागरिकांना राशनकार्ड वितरण, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र, संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनांतर्गत लाभार्थ्यांना मासिक अनुदानाचे प्रमाणपत्र देण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांनी महसूल दिनाच्या निमित्ताने सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन डी. एम. दहीकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार अमोल गव्हारे यांनी मानले.