गडचिरोली जिल्ह्यासाठी 22 जुलैला ऑरेंज अलर्ट जारी ; शाळा, महाविद्यालये राहणार बंद

60

– नागरिकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २१ जुलै नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार, गडचिरोली जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला असून 21 जुलै रोजी रेड तर 22 जुलै रोजी ऑंरेंज अलर्ट आहे. या कालावधीत जिल्ह्यात  विजांच्या कडकडाटासह वादळ व मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मागील ५ दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्याने नद्या व नाल्यांना पूर येऊन अंतर्गत मार्ग बंद आहेत. त्यामुळे 22 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, विद्यालये, महाविद्यालये, अंगणवाड्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय मिना यांनी निर्गमित केले आहे.

मुसळधार पाऊस व जोरदार वारा असताना खिडक्या आणि दरवाज्यापासून दूर रहावे. रोडवे, अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साठते अशा भागातून जाणे टाळावे. मुसळधार पावसात वाहने चालवणे टाळावे. पूर आलेला रस्ता ओलांडून गाडी चालवण्याचा प्रयत्न करू नये. पाणी दिसते त्यापेक्षा खोलवर मोडतोड तीक्ष्ण किंवा धोकादायक वस्तू्, भांडे, छिद्र किंवा विजेच्या तारा असू शकतात. पॉवर लाईन्से किंवा विजेच्या तारांपासून दूर रहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

वादळ, मेघगर्जना, विजा चमकत असताना घ्यावयाची काळजी

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळावे. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावे. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करावे. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहावे. पाण्यात उभे असाल तर तत्काळ पाण्यातून बाहेर पडा व आकाशात विजा चमकत असताना फोनचा वापर करू नये, विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नये. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहु नये. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नये, हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

शनिवारी शाळा, महाविद्यालय राहणार बंद

मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात काही भागात मुसळधार पावसासह अतिवृष्टी झाली असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील नद्या व नाल्यांना पूर आल्याने बरेच अंतर्गत मार्ग बंद आहेत. त्यामुळे 22 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, विद्यालये, महाविद्यालये, अंगणवाड्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय मिना यांनी निर्गमित केले आहे. जिल्ह्यातील गोदावरी, प्राणहिता, बांडिया, पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती आदी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पूर परिस्थतीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरिता आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष संजय मिना यांनी गडचिरोली जिल्हा सीमाक्षेत्रामध्ये 22 जुलैला सर्व शाळा, विद्यालये, महाविद्यालये व अंगणवाड्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.